कला-साहित्य

भाऊसाहेब बांदोडकर ते डॉ. प्रमोद सावंत

– वामन प्रभू

पत्रकारितेतील दीर्घ प्रवासात राजकीय क्षेत्रापासून दूर रहाणे अशक्यच होते.किंबहुना पत्रकारितेतील कामाचा तो एक प्रत्यक्ष भागच असल्याने या काळातील राजकीय घडामोडींचा, झालेल्या निवडणुकांचा, पक्षा-पक्षांमध्ये झालेल्या अनेक बंडांचा मी एक साक्षीदारच होतो. पत्रकारितेतील माझा प्रवेश हा ऑक्टोबर 1969 चा. 1963 आणि 1967 मध्ये घेतल्या गेलेल्या विधानसभा निवडणुका आणि 16 जानेवारी 1967 मध्ये गोव्याचे भवितव्य ठरवण्यासाठी घेतलेला जनमत कौल याचा अपवाद सोडल्यास त्यानंतरच्या सर्व विधानसभा निवडणुका असो वा गोव्यातील दोन जागांसाठी लोकसभेच्या झालेल्या निवडणुकी मी पत्रकार या नात्याने अगदी जवळून बघितल्या आहेत. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांच्यापासून विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापर्यंतच्या सर्वच्या सर्व तेरा मुख्यमंत्र्यांनाही मी अगदी जवळून पाहिले आहे, अनुभवलेही आहे.

किंबहुना पत्रकार या नात्याने त्यांच्या अगदी जवळपासही पोचलो आहे. दयानंद बांदोडकर, शशिकला काकोडकर, डॉ. लुईस प्रोत बार्बोझा, डॉ. विल्फ्रेड डिसोझा, मनोहर पर्रीकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आज आमच्यात नाहीत. भाऊसाहेब बांदोडकर आणि स्व. मनोहर पर्रीकर यांना अधिकारावर असताना मृत्यू आल्याने मिरामार समुद्रकिनार्यावर शासकीय ईतमामाने त्यांच्यावर झालेल्या अंत्यसंस्काराचाही मी एक साक्षीदार बनून राहिलो आहे. गोमन्तकमध्ये सुरुवातीच्या काळात सात-साडेसात वर्षे उपसंपादक आणि मुख्यउपसंपादक या नात्याने काम करत असल्याने ‘न्यूजफिल्ड’वर प्रत्यक्ष हजर राहण्याची संधी कमीच मिळाली. परंतु क्रीडा प्रतिनिधी म्हणूनही काही वर्षे काम करण्याची जबाबदारी संपादक स्व. माधव गडकरी यांनी सोपवल्याने मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांचा क्रीडा क्षेत्रातील काही स्पर्धांच्यावेळी सहवास लाभला आणि त्यांना जाणून घेयासाठी तेवढा काळ पुरेसा होता. त्यांच्या मृत्युआधी काही तास, पणजी जिमखान्यातील एका बक्षीसवितरण समारंभात त्यांच्यासमवेत मी होतो अर्थात विधानसभेचे कामकाज पाहाण्याच्या निमित्ताने मी प्रेक्षागॅलरीतही अनेक वेळा जाऊन बसलो असल्याने सभागृहातील भाऊसाहेब बांदोडकर आणि विरोधी पक्षनेते डॉ. जॅक सिक्वेरा यांच्यातील शाब्दिक चकमकीही अनुभवल्या आहेत. गोव्याची पहिली विधानसभा निवडणूक झाल्यापासून पुढील सुमारे दहा वर्षे गोव्याचे राजकारण मला वाटते याच दोघांपुरते केंद्रित झाले होते आणि 70-73 च्या दरम्यान त्यांच्या या राजकारणाचा अगदीच जवळून नसलो तरी पत्रकार या नात्याने एक साक्षीदार राहिलो आहे.

bhausahebपहिली विधानसभा निवडणूक माझ्या विशेष आठवणीत नसली तरी 1967 च्या सार्वमत कौलाच्या वेळी दिले जाणारे ‘झालाच पाहिजे’चे नारे मात्र बर्याच प्रमाणात मनःपटलावर अजून ठाण मांडून आहेत. गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण झालेच पाहिजे यासाठी म.गो. पक्ष जीवाचे रान करत होता, तर या प्रदेशाच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी बाकीचे सारे झुंजत होते. गोव्याचे शाहीर स्व. उल्हास बुयांव यांच्याशी याच सुमारास झालेली ओळख अखेरपर्यंत मैत्रीरुपात राहिली. अगदी भारावून टाकणारा तो काळ होता. रस्ते, भिंती, सार्वजनिक जागा रंगवण्यासाठी त्यावेळी सर्वानाच रान मोकळे होते. रातोरात कार्यकर्ते मिळेल ती जागा आपल्या घोषणांनी रंगवून टाकण्याची संधी सोडत नसत. आज निवडणुकीत हे प्रकार थांबले आहेत. सार्वजनिक रस्ते वा जागा रंगवल्यास आता विद्रुपीकरणासाठी खटला दाखल होऊ शकतो.

पहिल्या विधानसभा निवडणुकीतील जिंकून आलेले दत्ताराम चोपडेकर, टोनी फर्नांडिस, वि.सु. करमली, पां.पु. शिरोडकर, रघुनाथ टोपले, अच्युत उसगावकर, लुईस प्रोत बार्बोझा, तिओतिना परेरा, जॅक सिक्वेरा यांच्यासह कदाचित आणखी एक-दोघांशी नंतर माझी भेट झाली. अर्थात ‘गोमन्तक’मध्ये काम करत असतानाच यांच्यातील काही मंडळी संपादक माधव गडकरी यांना भेटण्यासाठी कार्यालयात
यायची, तर काहींची भेट ही ‘न्यूज फिल्ड’वर काम करू लागल्यानंतरच झाली होती. सार्वमत कौलातून गोव्याचे वेगळे अस्तित्त्व कायम ठेवण्याचा निर्धार गोमंतकियांनी व्यक्त केल्यानंतर लगेच एप्रिल 1967 मध्ये घेतल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीत स्व. भाऊसाहेबांच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानेच बाजी मारली आणि पुन्हा सरकार घडवले. यावेळीही मी पत्रकारितेत नव्हतो, परंतु दुसर्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या अनेकांशी नंतर पत्रकार म्हणून माझी गाठभेठ झाली आणि त्यात स्व. मुख्यमंत्री शशिकला काकोडकर, स्व. प्रताप बकाल, स्व. गोपाळ आपा कामत, गजानन पाटील तसेच यु.गो.तील रॉक सांतान फर्नांडिस, यशवंत देसाई, अनंत नरसिंह नायक, नारायण फुग्रो यांचा समावेश आहे. स्व. अनंत उर्फ बाबू नायक यांचे सभागृहातील तावातावाने बोलणे आजही जशाच्या तसे डोळ्यांसमोर आहे. जिभेला बोट लावून हातातील पाने उलटवण्याची त्यांची खासियत होती. तावातावाने बोलताना तर बाबू लालीलाल व्हायचे. पां.पु. शिरोडकर, गोपाळ आपा कामत यांच्या सभापतीपदाचा काळ काही प्रमाणात आठवतो. त्यानंतर नारायण फुग्रो यांच्यापासून सर्व सभापतींचे कामकाज एक बातमीदार म्हणून मी जवळून पाहिले असल्याने त्यावरही खूप काही लिहीता येईल.

दयानंद नार्वेकर यांच्या सभापतीपदाचा काळ सुनीता हळदणकर प्रकरणाने वादग्रस्त ठरला आणि त्याची नार्वेकर यांना जबर राजकीय किंमत मोजावी लागली. दयानंद नार्वेकर यांना मी तसा बराच जवळ होतो. परंतु राजकारणाचे त्यांनी बाजारात रुपांतर केल्याने पुढे ही जवळीक संपली. सुनीता हळदणकरप्रकरण जगजाहीर झाल्यानंतर नार्वेकर यांच्याविरुद्ध आंदोलन बरेच पेटले. मला आठवते, एक दिवस नार्वेकर पणजीत काँग्रेस हाऊसमध्ये आले असता त्यांना आंदोलकांनी घेरले. त्यांची एम.एस. प्रभू आदी संतप्त मंडळींपासून सुटका करण्यात मी आणि सुरेश काणकोणकर यांनीच पुढाकार घेऊन तेथून जवळच असलेल्या कॉफे प्रकाशपर्यंत नेऊन त्यांना गाडीत बसवले. सुनीता हळदणकरच्या लिखित पत्राची प्रत आजही माझ्या संग्रहात आहे. सुनीता प्रकरणानेच त्यांच्या हळदोणे या बालेकिल्ल्यातून त्यांना रत्नाकर चोपडेकर यांच्यासारख्या नवोदिताकडून नंतर हार पत्करावी लागली. तो त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी सेटबॅक ठरला.
पत्रकारितेच्या माझ्या प्रवासात अनेक राजकीय नेत्यांचा उदय आणि अस्त मी जवळून पाहिला. त्यात अर्थातच दयानंद नार्वेकर यांचे नाव आघाडीवर आहे. सुनीता हळदणकर विनयभंग, नंतर भारत – ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या वेळचे बोगस तिकीट प्रकरण आणि गोवा क्रिकेट असोसिएशनमधील अन्य घोटाळे यामुळे दयानंद नार्वेकार यांचे राजकीय वजन हळुहळू संपुष्टात आले. दोन दशकाहून अधिक काळ उलटल्यानंतरही बोगस तिकीट प्रकरणातील खटल्याचा निकाल अजून लागला नसला तरी आता त्या निकालातही कोणाला रस आहे असे दिसत नाही. त्याआधी सभापती म्हणून नारायण फुग्रो यांनी तत्कालीन मुख्यमंत्री श्रीमती शशिकला काकोडकर यांच्या विरोधात घेतलेल्या पवित्र्याने त्यांचीही राजकीय कारकीर्द संपुष्टात आली होती.

दाबोळीचे तत्कालीन आमदार शंकर लाड यांच्या नेतृत्वास पाठिंबा देण्याची काही आमदारांबरोबरची त्यांची चाल नारायण फुग्रो यांच्यासाठी घातक ठरली. या अध्यायात फुग्रो आणि त्यांच्याबरोबर शंकर लाड यांचेही राजकीय अस्तित्त्व संपुष्टात आले. ‘गोमन्तक’मध्ये असतानाच हा अध्याय झाला आणि त्याची झळ संपादक दत्ता सराफ यांनाही बसली. दीवमधून नारायण फुग्रो यांच्या जागी सोमजीभाई सोळंकी यांनी नंतर गोवा विधानसभेत प्रवेश केला. सभापती म्हणून मात्र नारायण फुग्रो यांनी एकूण कामकाजावर त्यांची छाप पाडली होती. संपादक माधव गडकरी यांनी त्यांच्यावर ‘सभापती की सोरोपती’ या शिर्षकाखाली लिहीलेल्या लेखानेही वादंग माजला. माधव गडकरी यांनी सभापतींचा अवमान केल्याबद्दल हक्कभंगाच्या कारवाईलाही तोंड द्यावे लागले होते. नारायण फुग्रो यांच्या कारकिर्दीत अखेरच्या टप्प्यात हे सारे घडले होते. अर्थात दोन वर्षे आधीच विधानसभा बरखास्त होऊन 1980 मध्ये विधानसभा निवडणुकांना तोंड देण्याची वेळ श्रीमती शशिकला काकोडकर आणि त्यांच्या पक्षावर आली.

श्रीमती काकोडकर यांच्यासाठीही ही निवडणूक म्हणजे त्यांचा राजकीय अस्तच ठरला. गोवा, दमण आणि दीव संघप्रदेशात 1980 मध्ये घडलेले हे राजकीय परिवर्तन मी अगदी जवळून पाहिले आहे. दिलखूष देसाई आणि दयानंद नार्वेकर या दोघांना त्यावेळी सडेतोड आमदार म्हणून ओळखले जायचे. गोमन्तक आदी दैनिकातून त्यांचा उल्लेख सडेतोड आमदार म्हणूनच व्हायचा. त्यांच्यामुळेच श्रीमती काकोडकर यांचा खरा मुखभंग झाला आणि अखेर विधानसभेत अर्थसंकल्पावरील मतदानाच्यावेळी सभापती नारायण फुग्रो यांनी आपले निर्णायक मत सरकारच्या विरोधात दिल्यानेच त्याचा राजकीय विस्फोट झाला. गोव्यात होऊ घातलेल्या राजकीय परिवर्तनाची ही घटना खर्या अर्थाने नांदी ठरली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या पर्वाचाही तो अस्त ठरला. शशिकला काकोडकर यांनी आपले सरकार वाचवण्यासाठी काही करायचे बाकी ठेवले नाही. श्रृंगेरी मठात जाऊन आपल्या सर्व आमदारांसह केलेल्या होम-हवनचा भोपळा तर गोमन्तकनेच फोडला होता. 1967 मध्ये फोंडा मतदारसंघातून प्रथमच निवडून आलेल्या, दयानंद बांदोडकर मंत्रिमंडळात राज्यमंत्री राहिलेल्या शशिकला काकोडकर यांच्या डिचोलीतील पराभवाने त्यांच्या कारकीर्दीची ईतिश्री झाली. तीन वर्षांआधी ज्या डिचोलीत श्रीमती काकोडकर सहजपणे विजयी झाल्या होत्या त्याच मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचा पराभव करत हरिश झांट्ये यांनी गोव्याच्या राजकीय क्षितिजावर आपली एन्ट्री केली. दानशूर हरिश उर्फ अण्णा झांट्ये यांचाही राजकीय उदय आणि अस्त आमच्या डोळ्यांदेखत झाला. उत्तर गोव्याचे खासदार म्हणूनही लोकसभेत त्यांना एक टर्म मिळाली. अलीकडेच हरिश झांट्ये यांनी या जगाचा निरोप घेतला.

1973 च्या ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे निधन झाले आणि त्यांच्या मांद्रे मतदारसंघातून अ‍ॅड. रमाकांत खलप हे पोटनिवडणुकीत विजयी झाले. आमचे मित्र रमाकांत खलप यांचा हा राजकीय उदय होता. गोव्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या आणि या प्रदेशाचे स्वतंत्र अस्तित्त्व ठेवण्यात ज्यांनी खूप मोठे योगदान दिले त्या डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या युनायटेड गोवन्स पक्षाचे अस्तित्त्व केवळ तीन निवडणुकांपुरतेच टिकले. 1977 च्या निवडणुकीत या पक्षाची जागा काँग्रेस पक्षाने घेतली आणि नंतर युगोचा ‘हात’ हा काँग्रेसचाच ‘हात’ बनला. 1972 मध्ये झालेल्या गोवा संघप्रदेशाच्या तिसर्या विधानसभा निवडणुकीपर्यंत म.गो. पक्षाशी तोडीस तोड लढत देणार्या यु.गो.ला गटबाजीने पोखरले होते आणि त्याचेच पर्यवसान हा प्रादेशिक पक्ष संपण्यात झाले. बाबू नायक यांच्यासह यु.गो.चे अनेक नेते काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने या प्रदेशात नावालाही नसलेल्या काँग्रेस पक्षाने कात टाकण्यास सुरुवात केली.

pratapsingh raneम.गो.चे प्रतापसिंग राणे यांचे श्रीमती शशिकला काकोडकर यांच्याशी पटत नव्हते. त्यांनीही विधानसभा निवडणुकीच्या आधीच मंत्रिपद आणि म.गो. पक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेसला बळ दिले. 1977 च्या निवडणुकीतील 10 जागा जिंकून काँग्रेसने खर्या अर्थाने युनायटेड गोवन्स पक्षाची जागा विधानसभेत घेतली. जनता पक्षाच्या त्यावेळच्या लाटेत माधव बीर (पणजी), फेर्दिन रिबेलो (कुंकळ्ळी) आणि जॅक सिक्वेरा (सांताक्रुझ) या तिघांनी मुसंडी मारली. गोवा विधानसभेत जनता पक्षाच्या रुपात एखाद्या राष्ट्रीय पक्षाने प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. त्यानंतर मात्र हे तिघेही पुन्हा विधानसभेत दिसले नाहीत. सत्तरीतून प्रतापसिंह राणे यांचा विजय निश्चित होता, तर बाबू नायक यांनाही तसे कोणतेही आव्हान नव्हते. या निवडणुकीचे आणखी एक विशेष म्हणजे याच निवडणुकीत असे सात उमेदवार जनतेने निवडून दिले की ज्यांनी पुढे जाऊन विधानसभेचे सभापतीपद भूषवले, तर किमान तिघांकडे उपसभापतीपद चालून आले. जे सभापती बनले ते म्हणजे दयानंद नार्वेकर, स्व. नारायण फुग्रो, अलीकडेच ज्यांचे निधन झाले ते प्रा. सुरेंद्र सिरसाट आणि शेख हसन हरुण तसेच फ्रायलानो माशादो, फ्रान्सिस सार्दिन आणि प्रतापसिंग राणे. 77 मध्ये सत्तेवर आलेल्या श्रीमती शशिकला काकोडकर यांचे सरकार उणेपुरे तीन वर्षे चालले आणि दोघा सडेतोड आमदारांना सांभाळणे मुख्यमंत्र्यांना कठीण झाल्याने विधानसभा बरखास्ती त्यांच्या वाट्याला आली. अशा राजकीय घडामोडीतूनच पत्रकार या नात्याने पहिल्या आठ-नऊ वर्षांत मला खूप काही अनुभवता आले आणि पत्रकारितेतील पुढच्या प्रवासात त्याची मला मदतच झाली.

गोव्याच्या आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये अर्थातच स्व. मनोहर पर्रीकर यांच्याशी माझी चांगली नाळ जुळली होती हे खरे असले तरी लुईझिन फालेरो, चर्चिल आलेमांव, रवी नाईक, फ्रान्सिस सार्दिन, लक्ष्मीकांत पार्से कर आदी माजी मुख्यमंत्र्यांकडील माझे मैत्रीसंबंधही नेहमीच एकमेकांना अरेतुरे संबोधण्याइतके चांगले राहिले आणि अजून टिकून आहेत. त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या काही खास आठवणीही मनाच्या एका कप्प्यात ठाण मांडून आहेत. सगळ्यांनीच मला प्रेम दिले आहे. लुईझिन – सार्दिन यांच्याशीही माझी चांगली गट्टी जमली होती. आजही ती आहे. चर्चिल अजूनही काही काम निघाले की आपणहून संपर्क साधतात. पर्रीकर – श्रीपाद नाईक यांच्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच भाजपशी जोडला गेल्याने लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशीही नेहमीच संबंध चांगले राहिले. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मला त्यांच्या एका कर्मचार्याने अडवल्याचे लक्षात येताच त्याला धारेवर धरणारे पार्सेकर मला आठवतात. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचीही अगदी पहिल्यांदा त्यांनी उमेदवारी दाखल केल्यापासूनची ओळख नंतर अधिकच दृढ झाली.

पत्रकारिता करताना हे नाते, मैत्री जपणे कशाचीही अपेक्षा न करता जपणे महत्त्वाचे असते, हा गडकरी यांचा आदर्श माझ्यासमोर नेहमीच राहिला. मिकी पाशेको प्रकरणात दिगंबर कामत यांनी सूडभावनेने कारवाई करण्याचा घेतलेला पवित्रा, आमच्या चॅनलच्या एका प्रस्तावास ‘पर्रीकर यांचा माणूस’ हे लेबल लावून दिलेली नामंजुरी सोडता त्यांच्याकडील संबंधही आज आधीप्रमाणे उत्तम आहेत. सभापतीपदावरील दयानंद नार्वेकर, स्व. सुरेंद्र सिरसाट, विश्वास सतरकर जे आज गोव्याचे मुख्य माहिती आयुक्त आहेत. स्व. अनंत शेट, विद्यमान सभापती राजेश पाटणेकर यांच्याशीही आमचे कधी बिनसले नाही वा संघर्ष करण्याची वेळ आली नाही. राजकारण आणि मैत्री याकडे वेगवेगळ्या दृष्टीतून पाहिल्यास हे सर्व शक्य आहे. एदुआर्द फालेरो, रमाकांत खलप, श्रीपाद नाईक यांनी केंद्रिय मंत्रिमंडळात वेगवेगळी पदे भूषवली. श्रीपाद नाईक आजही मोदी सरकारात आहेत. दिल्लीत गेलो तर त्यांच्याच बंगल्याला राहण्यासाठी पहिली पसंती असते. या सगळ्याच नेत्यांशी आजही माझी चांगली मैत्री आहे. पत्रकारितेच्या प्रवासात हे नाते टिकून राहाणे महत्त्वाचे होते. पन्नास वर्षांत अनेक मंत्री, आमदार, खासदार आले आणि गेले. पत्रकार या नात्याने अवघ्याच काहींचा अपवाद सोडल्यास सगळ्यांशीच आमचे जमले. माजी आमदार-खासदारांची आजही हटकून अधून-मधून भेट होते. जुन्या आठवणी उगाळल्या जातात. पत्रकारितेने अशा अनेक मित्रांची मला भेट दिली आणि तिचे मोल कोणत्याही मापाने मोजता येणार नाही. नुकतेच रमाकांत खलप यांच्या निवासस्थानी स्व. मोहन रानडे यांच्या स्मारक उभारणीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही काही जण जमलो होतो. त्यावेळी त्यांनी माझा ‘अजातशत्रू’ हा केलेला उल्लेख बहुधा याच कारणास्तव असावा.

(ज्येष्ठ पत्रकार वामन प्रभू यांच्या ‘द अ‍ॅक्सिडेंटल जर्नालिस्ट’ या ‘सहित प्रकाशन’च्यावतीने प्रकाशित होत असलेल्या आगामी पुस्तकातील प्रकरणातून…)

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: