सातारा 

कराड जनता बँकेचे कर्मचारी करणार बेमुदत उपोषण

 कराड (अभयकुमार देशमुख) :
कराड जनता सहकारी बॅंकेचे कर्मचारी १५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. बँकेचे व्यवस्थापक मनोहर माळी यांचा मनमानी कारभार आणि कर्मचाऱ्यांच्या बोगस कर्जाच्या प्रकरणाच्या तपासात होणारी टाळाटाळ थांबवून न्याय मिळावा, यासाठी कोरोनाचे नियम पाळून तहसीलदार कार्यालयासमोर कर्मचारी बेमुदत उपोषणास बसमार आहेत.
 

कराड जनता बँकेच्या २००५ पासुनच्या संचालक मंडळाने मनमानी करुन सेवकांची ​वार्षिक वेतनवाढ रोखली होती. मात्र ती मनोहर माळी यांनी मनमानी करूनच काही सेवकांनाच फरकासह दिली आहे. ती सरसकट मिळाली पाहिजे. सेवकांच्या पाच लाखांच्या आतील ठेवी परत मिळण्यासाठी योग्य ते अर्ज भरुन दिले आहेत. विमा कायद्यातंर्गत त्याला मंजुरी आहे, मात्र ​माळी यांनी मनमानी करुन त्या ठेवी परत देत नाहीत. त्या ठेवी परत मिळाव्यात. सेवकांचे हक्क रजेचे पगार काही ठराविक सेवकांना दिले आहेत. ते सर्वांनाच द्यावेत. सेवकांकडे कर्ज फेडल्याचे ना हरकत दाखले आहेत. तरिही त्यांच्याकडून मनमानी वसुली करत आहेत. नोटीसा पाठवत आहेत. ​वास्तविक त्याबाबत फौजदारी न्यायालयात दावा दाखल आहे. त्याच्या तपासाचे आदेश देत न्यायालयाने अहवाल मागवला आहे. मात्र पोलिस तपासही करत नाहीत व अहवाल देत नाहीत. त्यामुळे त्यात स्वतंत्र गुन्हा नोंद करुन अहवाल द्यावा. न्यायालयात फिर्याद देण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडेही चौकशीची मागणी केली होती. त्याची दखल घेतली गेली नाही.

 

न्यायालयात दाखल फिर्यादीत तत्कालीन संचालक मंडळासह बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावावर ४ कोटी ६२ लाख ८७ हजार रूपये दबाव टाकून उचलले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल व्हावा, त्या सगळ्याचीच सखोल चौकशी व्हावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. फिर्यादीनुसार पोलिसांना कर्मचाऱ्यांच्या कर्जप्रकरणात तपासाचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही होत नाही. त्यामुळे उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागतो आहे. त्या सगळ्यात शासनाने लक्ष घालावे आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा यासाठी उपोषणाशिवाय पर्याय नाही.

 

उपोषणात जनता बँकेच्या स्वेच्छा निवृत्तीसह राजीनामा दिलेल्या व निवृत्त कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पिडित कर्मचाऱ्यांच्या वतीने १५ ऑगस्ट पासून येथील तहसीलदार कार्यालयसमोर बेमुदत उपोषण ​करणार आहेत. त्यावेळी कोवीडचे नियम पाळून कर्मचाऱ्यांतर्फे पाच व्यक्ती सामाजिक अंतर ठेवून उपोषणास बसणार आहेत​, असे सांगण्यात आले. ​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: