सातारा 

काय होणार ‘कृष्णा’काठी?

– अभयकुमार देशमुख

कृष्णाकाठचे धुमशान म्हटले की क्षणात डोळ्यासमोर कृष्णा कारखाण्याच्या निवडणुकीचे चित्र उभे राहते. आणि जर कृष्णा कारखान्याची निवडणुक लागलीच… तर मात्र दोन जिल्ह्यातल्या अनेक गावांच्या पारा पारावर कृष्णेच्या स्थापनेपासून ते होवून गेलेल्या गत काळातील निवडणूकीचे किस्से चवीने चळघळले जातात.

कृष्णा कारखान्याची स्थापना ही कृष्णाकाठला सधन बनवणारी एक मोठी संस्था आहे. अनेक वर्ष हा कारखाना कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत राहत आला आहे. कृष्णा कारखान्याचे नाव निघाले की या कारखान्याशी जोडलेली नावे डोळ्यासमोर उभी राहतात. यामध्ये दिवंगत आबासाहेब मोहिते, दिवंगत यशवंतराव मोहिते, दिवंगत जयवंतराव भोसले हे सुरुवातीच्या फळीतले आणि त्यानंतर मदन मोहिते, इंद्रजीत मोहिते, सुरेश भोसले, अतुल भोसले ही नावे समोर येतात. मागच्या काही दिवसात यामध्ये अजून एका नावाची भर पडलीय आणि ते नाव म्हणजे अविनाश मोहिते.

त्यानंतर या कारखान्याशी जोडली जाणारी राजकीय नेत्यांची नावे अशी आहेत. दिवंगत माजी मंत्री विलासकाका पाटील, दिवंगत माजी मंत्री पतंगराव कदम, दिवंगत पी. डी पाटील,  मंत्री जयंत पाटील, मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आता विलासकाका पाटील यांच्या निधनानंतर नंतर उदयसिह पाटील तर पतंगराव कदम यांच्या निधनानंतर मंत्री विश्वजीत कदम ही नावे जोडली जातात. यामध्ये अजूनही काही नेते आहेत. पण प्रामुख्याने कृष्णेच्या निवडणुकीत या नावांची चर्चा अधिक होताना दिसते.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे जवळपास चाळीस हजारांच्या वर सभासद संख्या आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील साधारणपणे पाच तालुक्यात म्हणजेच कराड, वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव या तालुक्यात या कारखान्याचे सभासद आहेत.

या वर्षीच्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आणि पुन्हा कृष्णाकाठला कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या चर्चाना सुरुवात झाली. त्यामध्ये सद्यस्थितीत प्रामुख्याने ती चर्चा निवडणुकीत किती पॅनेल असतील यावरुन सुरु झालीय. याचे कारण मागच्या काही दिवसात इंद्रजीत मोहिते यांचे यशंवतराव मोहिते रयत पॅनेल आणि अविनाश महिते यांचे संस्थापक पॅनेल यंदाची निवडणूक एकत्रीत लढवणार असल्याची चर्चा होवू लागलेली. यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मंत्री विश्वजीत कदम यांच्यासमक्ष चर्चा झाल्याचेही बोलले जात होते. पण जशी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. तसे कृष्णा कारखाण्याचे  माजी चेअरमन इंद्रजीत मोहिते यांनी आपल्या समर्थकांसह अर्ज दाखल केले. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे काही अर्ज देखील दाखल झाले आहेत. तर संस्थापक पॅनेल म्हणजेच अविनाश मोहिते गटाचे काही अर्जही दाखल करण्यात आले आहेत.

निवडणुक जाहीर होण्याआधी इंद्रजीत मोहिते गट आणि अविनाश मोहिते गट एकत्र निवडणुकीला सामोरी जाणार असल्याची चर्चा सुरु झालेली. मात्र इंद्रजीत मोहिते गटाने भरलेले अर्ज पाहता. या मनोमिलनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे तिहेरी निवडणूक होण्याचे चित्र सद्यस्थितीवरुन उभे राहत आहे. यामध्ये  निवडणुक प्रकिया अजून जशी पुढे जाईल तसे बदल होवू शकतात. पण आजघडीला कृष्णेची निवडणुक ही तिहेरी होण्याची चिन्ह दिसत आहेत.

इंद्रजीत मोहिते आणि अविनाश मोहिते गटाचे मनोमिलन झाले तर या गटाला फायदा होणार असल्याची सभासद वर्गात चर्चा होवू लागली आहे. पण जर हे मनोमिलन झाले नाही. तर भोसले गटाच्या सहकार पॅनेलला त्याचा थेट फायदा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशीही चर्चा गावागावात सुरु झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात कृष्णेचे धुमशान तिरंगी होण्याची शक्यताही नाकारुन चालणार नाही.
अर्थात राजकारणात कधीही काहीही घडण्याची शक्यता असते. नव्हे तर यालाच राजकारण म्हंटले जाते. त्यामुळे अजून निवडणूक पार पडण्यास अवधी आहे. आणि त्यामुळेच कृष्णेची निवडणूक दुरंगी का तिरंगी ? हे येणारा काळच ठरवणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: