गोवा 

”लाडली लक्ष्मी’च्या भावनांशी भाजप सरकारचा खेळ’

मडगाव :

गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने आता तांत्रिकदृष्ट्या अवैध झालेली पत्रे पाठवुन लाडली लक्ष्मी योजनेच्या लाभधारकांच्या भावनांशी खेळ मांडला आहे. सरकारने लोकांना मुर्ख बनविणे थांबवुन त्वरित सर्व लाभधारकांची माफी मागावी अशी मागणी महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक यांनी केली आहे.

महिला व बाल कल्याण खात्यातर्फे गोव्यातील अनेक लाडली लक्ष्मी लाभधारकांना पाठवलेल्या मंजुरी पत्रावर २६ मार्च २०२१ व १८ जून २०२१ अशा तारखा आहेत. सर्व लाभधारकांनी दहा दिवसांच्या आत महिला व बाल कल्याण खात्याकडे दुपारी २ ते संध्याकाळी ५ या वेळेत संपर्क साधुन सर्व सोपस्कार पुर्ण करण्याचे सदर पत्रात नमुद करण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मार्चची तारीख असलेल्या पत्रांना आता तीन महिने झाले आहेत यावर बिना नाईक यांनी लक्ष वेधले आहे.

लोक कल्याणासाठी आपण काहितरी करीत आहोत हे दाखविण्यासाठी अवैध पत्रे पाठविण्याचा डाव भाजप सरकारने आखला आहे. प्रत्यक्षात मात्र सर्व मंजुरी पत्रे अवैध ठरवुन लोकांना फसविण्याचा सरकारचा कुटील डाव उघड होत आहे. सदर पत्रातच दहा दिवसात सर्व सोपस्कार पुर्ण न केल्यास लाडली लक्ष्मीचा अर्ज बाद होणार असल्याचे स्पष्टपणे लिहीले आहे.

भाजप सरकारने मार्च व जूनची पत्रे त्यावेळीच का पाठवली नाहित हे सांगावे. लाभधारकांना मंजुरी पत्रे पाठविण्यासाठी ३ महिने ते १५ दिवस असा विलंब का झाला यावर स्पष्टिकरण देणे गरजेचे आहे असे बिना नाईक यांनी म्हटले आहे.

आगामी विधानसभा निवडणूकीत आपला दारुण पराभव समोर दिसत असल्यानेच भाजप सरकार गोंधळले आहे. दोन ते तीन वर्षां मागील अर्जांची मंजुरी पत्रे आता पाठवुन सरकार सारवासारव करण्याचा प्रयत्न करीत आहे अशी टीका बिना नाईक यांनी केली.

भाजप सरकारने ताबडतोब नवीन आदेश जारी करावा व सदर पत्रांची वैधता वाढवावी तसेच सर्व लाभधारकांना आपले सोपस्कार पुर्ण करण्यासाठी योग्य वेळ द्यावा. सरकारने आता पर्यंत किती अर्ज मंजुर झालेले नाहित त्याची आकडेवारी जाहिर करावी व सदर अर्ज कधी मंजुर होतील याची तारीख स्पष्ट करावी अशी मागणी बिना नाईक यांनी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: