मुंबई 

‘माणिकरावांच्या निधनाने उत्तम सहकारी व मित्र गमावला’

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
महाडचे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी माणिकराव जगताप यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत रविवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले आहे. कॉंग्रेस पक्षाने कर्तृत्ववान आणि उमदे नेतृत्व गमावल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

माणिकराव जगताप हे काँग्रेसचे विद्यमान रायगड जिल्हा अध्यक्ष होते. महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी याआधी आमदारकी भूषवली होती. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची धुराही त्यांच्या खांद्यावर होती. आज दुपारी 2 वाजता महाड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

दरम्यान, महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या अकाली निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. जगताप यांच्या निधनाने उत्तम सहकारी व मित्र गमावला, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

कोरोनाने अनेक निकटवर्तीयांना आपल्यापासून हिरावून घेतले आहे. माणिकराव कोरोनावर मात करून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतील असे वाटत असतानाच त्यांचा निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते. माणिकराव हे उत्तम वक्ते, कुशल संघटक होते. ते सर्वांना बरोबर घेऊन काम करत, लोकांचे प्रश्न हिरीरीने मांडत. कोकणात काँग्रेस पक्षाचे संघटना बळकट करण्याचे काम त्यांनी केले. विद्यार्थी असताना एनएसयुआयमधून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये त्यांनी काम केले. २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी महाड मतदार संघातून विजय संपादन केला होता. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटनेला बळ देण्याचे काम त्यांनी केले. पक्षाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

जगताप यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे व वयैक्तिक माझी मोठी हानी झाली आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो. माणिकराव जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: