कला-साहित्य

कळवळ्याची सशक्त कविता भेटते… ‘कोणत्याही शक्यतेच्या पलीकडे’

  • दयासागर बन्ने
    ….

“आयुष्य सरता सरत नाही/
भोग सुटता सुटत नाही/ कष्टाच्या वळचणीचा पाऊस/
थांबता थांबत नाही…”

“ओप्यातील पाणी आटत जाते तसे
आयुष्य आळवावरच्या पानावरचे दवबिंदू जसे.”

“सगळेच आभाळ कसे/ फाटलेले फुटलेले../
पोटामधल्या आगीची /
धग घेऊन सुटलेले..”

“भंगलेले ठसे,
विस्कटल्या वाटा
बारमाही फाटा,जगण्याला ”

अशा आशयघन कविता देणारे शेगाव, तालुका जत (सांगली) येथील कवी लवकुमार मुळे यांचा सन २०१९ मध्ये ‘कोणत्याही शक्यतेच्या पलीकडे’ हा पाचवा कवितासंग्रह जागृती पब्लिकेशन, सोलापूर यांनी प्रकाशित केला आहे.जागतिकीकरणाचं मायाजाल, महामंदी व महामारीच्या काळात माणसाचं जगणं विस्कटलं आहे,अशा उद्विग्न अवस्थेत माणसाला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीच्या बंधात आणि खोल वेदनेच्या वावरात अस्तित्वाचा निखाऱ्यावर वास्तवाचं जळतं झाड म्हणजे ‘कोणत्याही शक्यतेच्या पलीकडे’ मधील कविता. अशा कुतरओढीच्या काळात कळवळ्याची सशक्त कविता भेटते ‘कोणत्याही शक्यतेच्या पलीकडे.’
लवकुमार मुळे यांची कविता माळावरच्या गुलमोहरासारखी फुलते. विपरीत स्थितीत जगायला शिकवते.अक्षरबागेत आपली भावमुद्रा उमटवते. हे करताना परिस्थितीच्या आणि जगण्याच्या ससेहोलपटीतून काळीजवेणा जपत आयुष्याला अर्धवेलांटी द्यायला ते कचरत नाहीत. आपला भोवताल पिंजून घेऊन ‘कोणत्याही शक्यतेच्या पलीकडे’ जाण्याची शक्यता कविता देईल, असे त्यांना वाटते.
कविता जगणार्‍या आणि जपणाऱ्या प्रत्येकाला हा संग्रह अर्पण करताना कवीने भोवतालात व्यक्त होण्यासाठी कविता आधार होईल असे म्हटले आहे. न गवसलेल्या कवितेची शोधयात्रा अजून चालूच असल्याचे त्यांनी प्रांजळपणे कबूलही केले आहे.

या संग्रहातील अनेक प्रतिमा- प्रतीके त्यांच्या चांगल्या कवितेची सुचिन्हे दाखवण्यास पुरेशी आहेत. रंध्राच्या हिरव्या रेषा, जगण्याची तिरमीर कथा, फसलेला पेरा, अस्तित्वाचा निखाऱ्यावरचे झाड, अंतरातली तळपेवांची घालमेल, वेदनेचे वावर, प्रकृतीची आभाळभर सावली, धगीचा चेहरा, वादळाची गाणी, उजेडाच्या लख्ख दिशा, संदर्भांचे गुपित, झिंगलेल्या आवर्तनांची मौज, एकलेपणाची शुष्क फांदी, आयुष्याच्या वळचणीचा पसारा, जगण्याचे रणांगण अशा अनेक कवितेतील सशक्त प्रतिमा आपणास कवितेच्या आशयविश्वाकडे खेचून घेतात. त्यातून रसिकसापेक्ष अर्थाची अनेक वलये निर्माण होतात.

या अक्षरउत्सवात कवीने धरतीच्या सुगंधी धुपाचा, रानामाळाच्या फुलांच्या फुलोऱ्याचा, पावसाच्या सरींचा स्पर्श- गंध शब्दांना दिला आहे. त्यामुळे ओंजळीतले पाणी जितके वेळ ओंजळीत राहते, तितक्या वेळीचे आनंदक्षण ओंजळक्षण म्हणून जपावेत मग उदासीही छान वाटेल अशी लवकुमार यांची कविता बोलते. आयुष्याबद्दल लिहिताना जगणे अधिक व्यापक व सुंदर करण्यासाठी अवतीभवती जमलेले सगळे श्वास बांधून ठेवावेत,मानवतेची सेवा करताना आपल्या व्यथा कथा बाजूला ठेवाव्यात असा आशय कवितेतून व्यक्त होतो. इथल्या कृषीपुत्राचे रक्ताचे पाणी करणे तरीही पेरा फसणे त्याला अस्वस्थ करते. ही स्थिती मांडताना
‘जगण्याचा गुंता पेरा फसलेला/
उरी झेललेला/ आगडोंब..’असे विव्हळ भाव अभाव कवितेत येतात.

जळत्या वास्तवाच्या विस्तवात चालणे त्या त्या काळात भागच असते. परिस्थितीशरण आयुष्याला अशावेळी कोणाची सोबत मिळेल याची शाश्वती नसते. म्हणून कवी लिहितो,
‘माणसांच्या माणूसपण हरवलेल्या गर्दीतून/
माहित नाही हा रस्ता नक्की कुठे जातोय..

ग्रामसंस्कृतीत वेगाने स्थित्यंतरे घडून गावगाड्याचे चित्र बदलले. समूहभावना कमी होऊन व्यक्तिकेंद्रित आयुष्य जगण्याची हूल उठली. उठवली. शिक्षितसमूहांत वित्त,स्थावर लोभसंस्कृती वाढली. हातावर पोट असणाऱ्यांची रोजीरोटी महागली. बारा बलुतेदारांची पैरा पद्धत संपली.कामे येईनात.पोटं भरेनात. काळ बदलला.या मातीतल्या कसदार धान्यापेक्षा मॉल, स्टाॅल, प्लास्टिकमधलं रेडीमेड विकतचं आणण्यावर भर वाढला. भौतिक सुविधा वाढल्या. देशी परंपरा अडगळीत पडल्या. गावशिवार यांचे प्रश्न बदलले. प्राधान्यक्रम बदलले, या आणि अशा अनेक बदलांचा वेध प्रतिमांतून घेण्याचा प्रयत्न कवीचा दिसतो पण समग्र अवकाश त्यांना पूर्णपणे पकडता आला नाही. तरीही बदलत्या पर्यावरणाचा वेध घेत कवीने समूह भावना व्यक्त केल्या आहेत.

‘चौकाचौकात
जगताना होळी
आयुष्याची पोळी
भाजताना’ असे ते व्यक्त होतात.

नूर पालटलेली व्यवस्था आणि हतबल जगणं यांत त्यांना निसर्गाचा आधार महत्त्वाचा वाटतो. पिंपळपार आणि त्याची छाया याबद्दल मग आकर्षण वाटते.
‘सरसर शिरवळ
मध्येच हिरवळ
माध्यान्ह मरगळ
झटकून अडगळ’

असे मरगळ झटकायला हिरवळ महत्त्वाची आहे,असे कवीला सांगायचे आहे. या हिरवळीच्या शोधात राहत माणदेश नि दुष्काळी टापूत दु:सह वाळलेल्या आयुष्याची व मातीनात्यांची कवी कविता लिहितो. स्वतःला जोडून घेतो. बोडके रानमाळ,शुभ्र जमलेले ढग,उन्ह काहिली, धरतीच्या मरणकळा,वैशाखवणवा यातून कवी अस्वस्थ होतो. रानाच्या आणि आपल्या आयुष्याबद्दल कवी लिहितो,
‘वेदनांच्या असंख्य वाटा तुडवत जाता गावा/
भाव मनातील धुंडीत जातो माझ्यामधला रावा..’

काळ्या जमिनीच्या जखमा आणि मनमातीच्या वेदना यांचा नेमका वेध प्रतीकातून घेत कवी लवकुमार मुळे लिहितात की,
‘रानबाभूळ बाहेरून
तग धरून/
आतून मात्र पडलेली उन्मळून..’अशा भवतालास कवेत घेत पावसासारखे सुखक्षण यावेत यासाठी कवी अक्षरनाती जोडू इच्छितो.
‘माणसांमाणसांत जोडलेला दुवा/
ओठांत विरघळणारा गोड खवा..’
अशी गोड फलश्रुती व्हावी आणि उजाड माळरानावर हिरवी शक्यता निर्माण व्हावी, यासाठी शब्दधन देणारे कवी लवकुमार मुळे यांच्या कवितांचा अभिव्यक्तीचा स्वर रसिकांच्या सुराशी जुळावा अशा अपेक्षा.हा कवितासंग्रह ‘कोणत्याही शक्यतेच्या पलीकडे’ काही नक्कीच जगण्याचे आश्वासक चित्र असते, हे सांगण्यात यशस्वी झाला आहे. मनमातीतील तणकट बाजूला सारून आयुष्य हिरवेगार होण्यासाठी दुष्काळात शब्दांचा सुकाळ पेरणारा हा कवी साहित्यप्रांतात आपली ‘मुळे’ खोलवर रुजवून आहे याचा आनंद वाटतो. दुर्बोध प्रतिमांच्या फवारणीने कोणत्याही कवितेचे ‘लव’ नैसर्गिक देशी आशय अभिव्यक्तीच्या रसाविना कोमेजू नये, एवढीच अपेक्षा.

काव्यसंग्रह : ‘कोणत्याही शक्यतेच्या पलीकडे’
कवी : लवकुमार मुळे
प्रकाशक: जगृती पब्लिकेशन ,सोलापूर
पृष्ठे :५६ मूल्य : ₹ ८०/-

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: