महाराष्ट्र

ती भेट राहून गेली !

  • डॉ.श्रीमंत कोकाटे

2017 साली आम्ही दिल्लीला गेलो होतो (प्रवीणदादा गायकवाड, अजयसिंह सावंत), त्यावेळेस संसदेचे अधिवेशन सुरू होते. त्यामुळे अनेक खासदारांच्या भेटी घेतल्या. त्यापैकी एक म्हणजे ऍड. राजीव सातव यांना भेटण्यासाठी आम्ही त्यांच्या बंगल्यावर गेलो, तेव्हा ते पंजाब येथील एका शिष्टमंडळाबरोबर चर्चा करत होते. आम्ही त्यांना आल्याची कल्पना दिल्याबरोबर त्यांनी आमची स्वतंत्र खोलीमध्ये बसण्याची व्यवस्था केली आणि मीटिंग संपून आलोच असा निरोप दिला. मिटिंग संपवून ते आले. आमची ही पहिलीच भेट होती, परंतु आम्ही खूप जुने मित्र आहोत अशा पद्धतीने ते बोलू लागले “मी तुमची भाषणे युट्युब वर नियमित ऐकतो, तुम्ही मंडळी करत असलेले काम खूप महत्वपूर्ण आहे, या विचाराची समाजाला खूप गरज आहे ” असे ते खूप भरभरून बोलत होते. दरम्यान चहापाणी,नाश्ता झाला. त्यांनी खूप जेवणाचा आग्रह केला, परंतु आम्ही नियोजित ठिकाणी जेवणासाठी जाणार होतो,परंतु त्यांनी आग्रह केला की ” आपण मान. राहुल गांधी,खा.ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह परवा डिनरला बसू, मी त्यांची वेळ घेतो. उद्या मी गुजरातला एक दिवसासाठी जाऊन येणार आहे, तरी परवा आपण नक्की भेटू” असे ते म्हणाले. आम्ही जाण्यासाठी निघालो, तेव्हा ते त्यांच्या बंगल्याच्या गेटपर्यंत सोडवायला आले. आम्ही त्यांना म्हणत होतो “आम्ही जातो.आपण थांबा. तुम्हाला खूप लोक भेटण्यासाठी आलेले आहेत ” तेव्हा ते आग्रहपूर्वक सोबत आले. त्यांचे आतिथ्य, त्यांची सौजन्यशीलता, इतक्या मोठ्या पदावर असून देखील कमालीची विनयशीलता, त्यांचा पक्षाप्रति, नेत्याप्रती, कार्यकर्त्याप्रती, जनतेप्रती असणारा प्रामाणिकपणा पदोपदी ठळकपणे दिसत होता. आम्ही त्यांचा निरोप घेतला.

rajeev satavत्यानंतर तिसर्‍या दिवशी पुण्यासाठी आमचे फ्लाइट असल्यामुळे आम्ही सुमारे बारा वाजता दिल्ली विमानतळावर पोचलो. विमानतळावर पोचल्याबरोबर राजीव सातव यांचा फोन आला की संध्याकाळी राहुल गांधी, ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबरोबर ठरल्याप्रमाणे आपल्याला डिनरसाठी बसायचे आहे, तरी तुम्ही या. त्यावेळेस आम्ही सांगितले की आम्ही पुण्यासाठी निघालो आहोत आणि आता दिल्ली विमानतळावर आहोत. राजीव सातव साहेबांनी खूप आग्रह केला “विमानाचे तिकीट कॅन्सल करा, उद्या जावा ” परंतु आम्ही नियोजित कार्यक्रम असल्यामुळे पुण्याला परत आलो.आम्हाला वाटले होते की परवा राजीव सातव सहज बोलले असतील आणि अधिवेशन काळात राहील गांधी आणि खा ज्योतिरादित्य शिंदे भेटणे शक्य होईल का? पण राजीव सातव हे दिलेल्या शब्दाला जागणारे नेते होते. राजीव सातव यांना परत येण्याचे आश्वासन दिले. ते खूप नाराज झाले. त्यांची इच्छा होती की महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार पेरणाऱ्या, निर्भीडपणे लढणाऱ्या तरुणांची ओळख व्हावी आणि पुढे आपल्याला कसे जाता येईल याबद्दल चर्चा करावी हे त्यांचे नियोजन होते. राजीव सातव म्हणजे दिलेल्या वचनाला जागणारे,देशभर प्रचंड जनसंपर्क असणारे, पक्षासाठी, लोकांसाठी सतत झटणारे अत्यंत प्रेमळ, प्रामाणिक, संवेदनशील धडपडणारे, लोकप्रिय लोकप्रतिनिधी होते. आक्रस्ताळेपणा नाही, कोणाबद्दल द्वेष नाही, आकस नाही अशा युवक नेत्याचा मृत्यू मनाला वेदना देणारा आहे.

आजकाल साधी आमदारांची कोण ओळख करून देत नाही,पण राजीवजी आमची ओळख राष्ट्रीय नेत्यांशी करून देत होते,इतके ते मोठ्या मनाचे होते. शेवटी त्यांच्यासोबतची ती भेट राहून गेली,याचे शल्य कायम राहील.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: