देश-विदेश

म्युकरमायकोसिसचा साथरोग कायद्यात समावेश

नवी दिल्ली :
करोना रोगाच्या साथीसोबतच म्युकरमायकोसिस या नव्या आजाराचा केंद्र सरकारने साथरोग नियंत्रण कायद्यामध्ये समावेश केला आहे. देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. तेलंगाणा आणि राजस्थानने याआधीच म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराला महामारी घोषित केलं आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने देखील म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णांची दखल घेतली असून या आजाराचा समावेश साथरोग कायद्यामध्ये करण्यात आला आहे. बुधवारी केंद्र सरकारकडून त्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली. आरोग्य विभागाचे सहाय्यक सचिव लव अगरवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार देशभरातील सर्व सरकारी-खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये यांना म्युकरमायकोसिसबाबत साथरोग नियंत्रण कायद्यामध्ये नमूद असलेल्या नियमावलींचं पालन करणं आवश्यक ठरणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता रुग्णांची तपासणी, उपचार आणि या आजाराच्या व्यवस्थापनासाठी साथरोग नियंत्रण कायद्यातील नियमावलीचा वापर करणं आवश्यक ठरणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारांना देखील आवाहन केलं असून त्यांनी देखील राज्य पातळीवर म्युकरमायकोसिसला साथीचा आजार म्हणून जाहीर करावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तेलंगणा, राजस्थान यासारख्या राज्यांनी आधीच या म्युकरमायकोसिसला साथीचा आजार म्हणून घोषित केलं आहे.

यासंदर्भात सहाय्यक सचिव लव अगरवाल यांनी सर्व राज्यांना लिखित स्वरूपात सूचना दिल्या असून साथरोग कायद्यांतर्गत म्युकरमायकोसिसचं व्यवस्थापन केलं जावं असं सांगितलं आहे. “तुम्हा सर्वांना विनंती आहे की म्युकरमायकोसिसचा समावेश साथरोग कायदा १८९७ अंतर्गत करण्यात यावा. यामध्ये सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये, आरोग्य सेवा केंद्र, वैद्यकीय महाविद्यालये यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करतील. यामध्ये रुग्णाची तपासणी, आजाराचं निदान आणि उपचार व्यवस्थापन यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर यांनी दिलेल्या सूचनांचं देखील पालन होईल. याशिवाय, म्युकरमायकोसिसचे संशयित आणि बाधित अशा रुग्णांची आकडेवारी आरोग्यविभागाला जिल्हानिहाय पुरवली जावी. यामध्ये जिल्ह्यातील मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित यंत्रणेचा समावेश असेल”, असं आरोग्यमंत्रालयाने जारी केलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: