गोवा 

लॉकडाऊन संपला; निर्बंध कायम 

पणजी :
लॉकडाऊनसाठी (lockdown) वाढता दबाव असतानाही सरकारने तो मान्य न करता पुढील आठ दिवसांसाठी केवळ निर्बंध कडक केले आहेत. सोमवारी सकाळी ६ वाजता लॉकडाऊन उठवला जाईल, मात्र त्यानंतर पुन्हा पुढील सोमवारपर्यंत (१० मे)  सकाळी ६ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू असतील. निर्बंधांचे पालन न करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली कारवाई केली जाईल. कोविड महामारीच्या अनुषंगाने लागू केलेले जमावबंदीचे कलमही राज्यात कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार, पुढील आठ दिवस सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने, औषधालये, कृषिमाल विकणारी दुकाने, मासळी मार्केट, पंचायत मार्केट चालू राहील. आठवडी बाजार बंद राहतील. धार्मिक स्थळांमध्ये केवळ पुजारी पूजा करतील.भाविकांना ती बंद असतील. कॅसिनो, बार, जलसफरी करणाऱ्या बोटी, सलून, सिनेमा हॉल, जलतरण तलाव, क्रीडा संकुले बंद राहतील.
उद्योग, कारखाने मार्गदर्शक तत्त्वें पाळून चालू राहतील. रेस्टॉरंट ७ ते सायंकाळी ७ या वेळेत ५० टक्के उपस्थितीने चालू राहतील. होम डिलिव्हरीसाठी  किचन २४ तास चालू राहू शकते. एटीएम, पेट्रोल पंप, एलपीजी गॅस दुकाने चालू राहतील तसेच बांधकाम साहित्य विकणारी दुकाने चालू असतील. सरकारी कार्यालये ५० टक्के उपस्थितीने चालू राहतील,अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. शाळा, महाविद्यालयें आदी शैक्षणिक संस्था बंद राहतील. केवळ परींक्षापुरती शैक्षणिक संस्था खुली ठेवता येईल. सामाजिक, राजकीय, क्रीडा करमणुकीचे कार्यक्रम बंद राहतील.
विवाह समारंभांना ५० लोकांपेक्षा अधिक उपस्थिती असता कामा नये तसेच अंत्यसंस्काराला २० पेक्षा अधिक लोकांना मनाई आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, कोविडचे रुग्ण तसेच मृत्यूचे प्रमाण वाढल्याने निर्बंध कडक केले आहेत. हे लॉकडाऊन नव्हे परंतु सर्वांनी  निर्बंधांचे कडक पालन करावे लागेल. महामारी तून सावरण्यासाठी डॉक्टर्स परिचारिका अथकपणे काम करत आहेत. प्राणवायूची तसेच रूग्णांसाठी खाटांची उपलब्धता केली जात आहे. जनतेने सरकारवर विश्वास ठेवावा. सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: