गोवा 

नवेवाड्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव

मुरगांव :
नवेवाडे येथे प्रभाग क्रमांक २० मध्ये चौघांना डेंगू झाल्याने येथे भितीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी जागृती आणि स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे नगरसेवक यतीन कामुर्लेकर यांनी स्पष्ट केले.

कोविड रुग्ण संख्या कमी होत असताना वास्कोत आता डेंगूने डोके वर काढले आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये एका २१ वर्षीय युवकाचे डेंग्यूने निधन झाल्यावर येथील रहिवाशांनी संताप व्यक्त केला होता. संबंधित अधिकारी वर्गावर यावेळी सर्व थरातून टीकेची झोड होत होती. त्यानंतर संबंधितानी हालचाली सुरू केल्या होत्या  जागृतीसाठी धावपळ सुरू झाली होती. गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे डेंगू रुग्णांबद्दल आवाज झाला नाही. मात्र यंदा कोरोना महामारी कमी होता होता आता डेंगूने डोके वर काढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. नगरसेवक यतीन कामुर्लेकर यांच्या प्रभाग २० मध्ये चौघांना डेंगू झाल्याने येथील नागरिक भयभीत झाले आहेत. या प्रकरणाची दखल घेताना कामुर्लेकर यांनी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रश्मी खांडेपारकर आणि इतरांच्या सहकार्याने या प्रभागात पाहणी केली. त्यावेळी काही घरातील वस्तू मध्ये जमा झालेल्या पाण्यामध्ये डासांच्या अळ्या तयार झाल्याचे दिसून आले. डेंगू होऊ नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. पुढील चार दिवसात तेथे जंतुनाशकाची फवारणी करण्यात येणार आहे.

दरम्यान लोकांमध्ये डेंगू संबंधी जागृती करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी सांगितले. डेंगू संबंधी आम्ही गंभीर आहोत. जंतूनाशक फवारणी करण्यासाठी औषधे खरेदी करण्यासंबंधी आपण मुख्याधिकाऱ्यांशी बोलले आहे. प्रत्येक प्रभागात संबंधित नगरसेवकांनी लक्ष द्यावे. डासांना पिटाळून लावण्यासाठी सायंकाळच्या वेळेत धूर फवारणी होणार असल्याचे कासकर यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: