मुंबई 

​लॉकडाऊनवर मात करत उभारली अखेर ‘सिडको’ची घरे ​

मुंबई​:

सिडकोने आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाच्या योजनांतर्गत अडीच वर्षांपूर्वी नवी मुंबईतील विविध भागातील घरांची सोडत काढली. या सोडतीमधील घरे उभारण्याच्या कामात लॉकडाऊनमुळे अनेक संकटे आली. त्यावर मात करत बी.जी. शिर्के कन्ट्रक्शन टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीने ही घरे सिडकोला तातडीने ताब्यात देण्याचा शब्द पाळला आहे. त्याप्रमाणे जून महिन्याच्या अखेरीस सुमारे 15 हजार घरांचा ताबा सिडकोला देण्यात येणार असून विजेत्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

सिडकोने 2018 मध्ये घणसोली, खारघर, कळंबोली, द्रोणागिरी व तळोजा येथील महागृहनिर्माण योजनेअंतर्गत सुमारे 15 हजार घरांची सोडत काढली. सोडतीमधील विजेत्यांना 2020 मध्ये घरांचा ताबा देण्यात येणार होता. मात्र कोरोना महामारी आणि देशात लॉकडाऊन लागू केल्यानंतर प्रकल्पाच्या कामात व्यत्यय आला. प्रकल्पाच्या ठिकाणी सुमारे साडे पाच हजार कामगार काम करत होते. मात्र लॉकडाऊन मध्ये बहुतांश कामगार आपल्या गावी परतले. यामुळे प्रकल्पाच्या कामावर परिणाम झाला.

सोडतीमधील विजेत्यांकडून घरांचा ताबा देण्याची मागणी होऊ लागल्याने सिडकोने जून 2021 पर्यंत घरांचा ताबा देण्याची विनंती शिर्के कंपनीला केली होती. त्यानुसार कंपनीने लॉकडाऊनमध्ये गावी गेलेल्या कामगारांना विमान, रेल्वे, बसच्या माध्यमातून पुन्हा कामाच्या ठिकाणी आणले. त्यांचे वास्तव्य, जेवणाची व्यवस्थाही कंपनीने प्रकल्पाच्या ठिकाणीच केली. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहे.

शिर्के कंपनीमार्फत कळंबोली आणि परिसरात उभारलेल्या घरांची वीज, पाणी, रस्ते, लिफ्ट आदी सर्व कामे पूर्ण केली आहेत. काही इमारतींना रंग लावण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. ते लवकरच पूर्ण होणार आहे. हे काम पूर्ण होताच जून महिन्याच्या अखेरीस सिडकोला घराचा ताबा देण्यात येणार आहे. त्यामुळे सोडतीमध्ये विजेते ठरलेल्या नागरिकांना लवकरच घरांचा ताबा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लॉकडाउनच्या संकटात गावी गेलेल्या कामगारांना विमान, रेल्वेच्या माध्यमातून देशातील कानाकोपऱ्यातून प्रकल्पाच्या ठिकाणी आणले. यांच्या जेवण, आरोग्याची काळजी घेत आम्ही प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण केले आहे. सिडकोला दिलेल्या शब्दानुसार आम्ही जून अखेर 15 हजार घरे ताब्यात देणार आहेत, असे  शिर्के कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन.व्ही. कुदळे यांनी सांगितले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: