महाराष्ट्र

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपची सरशी

मुंबई :
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या (BJP) समाधान अवताडे यांनी विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीपासून शेवटच्या काही फेऱ्यांपर्यंत हा सामना अगदी अटीतटीचा झाला. अखेर अवताडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असणाऱ्या राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा तीन हजार ७१६ मतांनी पराभव केला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेचा मुद्दा केली होती. पंढरपूर निवडणुकीत जनतेने ठाकरे सरकारविरोधात कौल दिल्याची पहिली प्रतिक्रिया अवताडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीय.
मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीत भाजपाच्या समाधान अवताडेंनी ४५० मतांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत अवताडेंना २ हजार ८४४ तर भालकेंना २ हजार ४९४ मतं मिळाली. दुसऱ्या फेरीत मात्र भालकेंनी ५०० हून आधिक मतांची आघाडी मिळवली. दुसऱ्या फेरीत भालकेंना ३ हजार ११२ तर अवताडेंना २ हजार ६४८ मतं मिळाली. तिसऱ्या फेरीअखेरीस भालकेंनी ६३५ मतांची आघाडी मिळवलीय. भालकेंना तिसऱ्या फेरीनंतर एकूण ८ हजार ६१३ मतं मिळाली आहेत तर आवताडेंना ७ हजार ९७८ मतं मिळाली आहेत. सातव्या फेरीपासून मात्र अवताडेंनी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली.
आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपुरात पोटनिवडणूक लागली. त्यामुळे आता भारत भालके यांचेच पुत्र भगीरथ भालके यांना पंढरपूरची जनता साथ देते, की डाव उलटवून समाधान अवताडे यांच्या गळ्यात विजयाची माळ घातले याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर हा निकाल अवताडे यांच्या बाजूने लागला. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण ३ लाख ४० हजार ८८९ मतदार असून एकूण ५२४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. गेल्या महिन्याभरात करोनाच्या निर्बंधांमध्ये देखील पंढरपूरसाठी या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली होती. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच सभेमध्ये झालेली गर्दी आणि करोना नियमांची पायमल्ली हा चर्चेचा आणि राजकारणाचा देखील विषय ठरला होता. त्याचवेळी भाजपाकडून देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर दिग्गज नेत्यांनी पंढरपूरमध्ये सभा घेतल्या होत्या. दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आल्यामुळे या जागेच्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या विजयानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी ट्विटरवरुन अवताडे यांचं अभिनंदन केलं आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Kindly Dont Copy !!