मुंबई 

‘बळीराजा सुखी होऊ दे, दुधदुभत्यांची समृद्धी येऊ दे’

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरच्या ‘बा पांडुरंगाच्या, माता रुक्मिणीच्या’ चरणी वंदन केले असून समस्त वारकरी बांधवांना, राज्यातील नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “यंदा राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊदे. माझ्या राज्यातला बळीराजा सुखी होऊदे. त्याच्या शेतशिवारात, घराघरात धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी येऊदे. बा पांडुरंगा, जगावर आलेलं कोरोनाचं संकट लवकर दूर कर. सर्वांना निरोगी, सुखी, समाधानी, आनंदी ठेव”, असं साकडंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बा पांडुरंगाच्या आणि माता रुक्मिणीच्या चरणी घातलं आहे.

आषाढी एकादशीनिमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राची संतपरंपरा, पांडुरंगभक्तीचा वसा आणि वारसा पुढे नेणाऱ्या तमाम वारकरी माऊलींनाही वंदन केले आहे. समाजातले सगळे भेदाभेद नष्ट करुन, बा पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने, सर्वांना एकत्र, समानतेच्या पातळीवर आणणारी पांडुरंगभक्तीची, पंढरपूरवारीची परंपरा आपले आध्यात्मिक, सांस्कृतिक वैभव आहे. हे वैभव सांभाळून पुढच्या पिढीकडे द्यायचं आहे. बा पांडुरंगाच्या कृपेने कोरोनाचे संकट लवकरच संपेल आणि आपण सर्वजण वारीने पंढरपूरला जाऊ शकू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: