देश-विदेश

‘त्या’ मुलांना मिळणार मोफत शिक्षण, दरमहा स्टायपेंड, १० लाखांची मदत!

नवी दिल्ली :
देशातील करोना कहरामध्ये मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यू ओढवला. यामुळे देशात असंख्य मुलं अनाथ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता ज्या मुलांचे दोन्ही पालक करोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत, अशा मुलांच्या शिक्षणाची आणि त्यांच्या भवितव्याची सोय व्हावी, म्हणून आता थेट केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. त्याशिवाय, या मुलांच्या शिक्षणाची देखील सोय या निधीमधून केली जाणार आहे.
करोनामुळे आपल्या आई-वडिलांना गमावलेल्या मुलांना पीएम केअर फॉर चिल्ड्रेन या योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाणार आहे. या मुलांना वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा स्टायपेंड अर्थात निश्चित अशी रक्कम दिली जाईल. त्यासोबतच त्यांनी वयाची २३ वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांना १० लाख रुपयांची रक्कम दिली जाईल. त्यांच्या भवितव्यासाठी ही रक्कम त्यांना मोठा हातभार लावणारी ठरेल.

अशा मुलांच्या शालेय शिक्षणाचा पूर्ण खर्च हा केंद्र सरकारकडून केला जाणार आहे. त्यामुळे या मुलांना शिक्षण मोफत मिळणार आहे. त्यासोबतच, उच्च शिक्षणासाठी या मुलांना शिक्षण कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. या कर्जाचं व्याज हे पीएम केअर फंडातून चुकवलं जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शून्य टक्के व्याजदराने हे शिक्षण कर्ज उपलब्ध होईल.

शिक्षण आणि आर्थिक मदतीसोबतच आयुषमान भारत योजनेअंतर्गत या मुलांचा ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा देखील काढला जाईल. १८ वर्षांपर्यंत या मुलांना या विम्याचं संरक्षण राहील. या विम्याचे हफ्ते केंद्र सरकारकडून भरले जातील.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: