गोवा 

​उद्या दुपारपर्यंत होणार वीजपुरवठा सुरळीत

​पणजी:
चक्रीवादळाने वीज खात्याचं मोठं नुकसान के​​लं आहे. अनेक ठिकाणचे खांब, विद्युत तारा, ट्रान्सफॉर्मर, कंडक्टर कोसळून खराब झाले आहेत. या गोष्टी तत्काळ जागेवर आणणं अशक्य असतं. परंतु वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून बऱ्याच ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. उर्वरित भागांतील पुरवठा गुरुवारी दुपारपर्यंत सुरळीत होईल, असा विश्वास वीजमंत्री निलेश काब्राल यांनी व्यक्त केला.
वीज खात्यातील अनेक कर्मचारी करोनाबाधित झाले आहेत. शिवाय परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यांत निघून गेले आहेत. त्यामुळेच वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात अडथळे आले. पण खात्याच्या कर्मचाऱ्यांनी आव्हान पेलत बहुतांशी कामं पूर्ण केली असल्याचे काब्राल यांनी सांगितले.
goa nilesh
निलेश काब्राल

वीज खात्याचे अनेक अधिकारी, कर्मचारी करोनाबाधित होऊन घरी बसले आहेत. त्यात खात्याच्या कंत्राटदारांकडे असलेले परप्रांतीय कामगार करोनामुळे अगोदरच आपापल्या राज्यांत गेले आहेत. त्यामुळे खांब उभारणं, केबल्स घालणं यांसारख्या कामांसाठी पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध झालं नाही. गेल्या दोन दिवसांत खात्याने महाराष्ट्र, कर्नाटकातून कामगार आणून ही कामं करून घेतली. बुधवारी राजस्थानातील कामगारांना विमानाने या कामासाठी आणण्यात आलं, असं ते म्हणाले. कोलमडलेले सर्वच खांब मान्सूनपूर्वी उभारून संपूर्ण राज्यातील वीज पुरवठ्याला बळकटी देण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

चक्रीवादळामुळे वीज खात्याचे सुमारे २२ कोटींचं नुकसान झाल्याची माहिती मुख्य वीज अभियंते रघुवीर केणी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. अंतर्गत वीजवाहिन्या असलेल्या पणजी, मडगाव, पर्वरी, कुडचडे, नुवे, वेर्णा आदी भागांतील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. इतर ठिकाणचीही ९९ टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे गुरुवारपर्यंत सर्वच ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत होईल, असंही त्यांनी नमूद केलं.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: