google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

1200 शाळांत आता ‘गोवा वाचतो आहे’

पणजी :

प्रत्येक मुलाला आनंददायक वाचनाचा अनुभव घेता यावा यासाठी आणि शाळांमध्ये वाचन संस्कृतीचा पुरस्कार करण्यासाठी शिक्षण संचालनालयाने प्रथम बुक्सच्या सहयोगाने ‘गोवा वाचतो आहे’ हा उपक्रम सुरू केला आहे. याला जगातल्या सर्वांत मोठ्या टेलिकॉम टॉवर कंपन्यांपैकी एक असणाऱ्या इंडस टॉवर या कंपनीचे साहाय्य लाभलेले आहे. भारतातल्या टेलिकॉम कंपन्यांना पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या या आघाडीच्या टॉवर कंपनीने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (व्यापक सामाजिक जबाबदारी) कार्यक्रमांतर्गत हे साहाय्य केलेले आहे.

ही मोहीम गोवा राज्यभरातल्या बालवाचकांसाठी राबवण्यात येत आहे. ती शासकीय शाळा, सरकारच्या अनुदानित शाळा व खाजगी स्वतंत्र शाळांमध्ये राबवण्यात येईल.


‘गोवा वाचतो आहे’ या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शाळांमध्ये वाचनासाठीची एक सुनियोजित संरचना स्थापन करून त्याद्वारे मुलांना वाचण्याची सवय लागावी हे आहे. हा राष्ट्रीय शिक्षण धोरण (२०२०) आणि निपुण भारत मार्गदर्शक सूचना यांच्या अनुसार कार्यान्वित करण्यात आलेल्या उपक्रम आलेला आहे. यामध्ये पहिले ते आठवीकरताची उत्तम गुणवत्ता असलेली मुलांसाठीची इंग्रजी व मराठी भाषेतली गोष्टीची पुस्तके आणि पूरक संसाधने शिक्षकांना आणि शाळांना कोणत्याही स्वामित्व हक्काविना नि:शुल्क उपलब्ध करून दिली जातील. इंग्रजी आणि मराठी भाषेतली ही संसाधने प्रथम बुक्सच्या सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या (www.storyweaver.org.in) या डिजिटल मंचावर उपलब्ध असतील. ही संसाधने मोफत वाचता येतील. याखेरीज प्रथम बुक्सच्या ‘वर्ग खोलीत ग्रंथालय’ या उपक्रमाअंतर्गत वर्गात वाचनासाठी छापील पुस्तकेही उपलब्ध असतील.


या उपक्रमाचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. उद्‍घाटन समारंभाला राज्यभरातल्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक हजर होते. एससीईआरटीचे संचालक श्री. नागराज जी. हुंन्निकेरी यांनी सर्वांचे स्वागत केले. शिक्षणसंचालक श्री. शैलेश झेंगडे यांनी प्रास्ताविकाचे भाषण केले. मा. मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांनी ‘गोवा वाचतो आहे’ या मोहिमेच्या पोस्टरचे अनावरण करून अधिकृतरीत्या या तिचे उद्‍घाटन केले. तसेच त्यांनी प्रथम बुक्सची ‘वर्गखोलीत ग्रंथालय’ ही सुविधा सॅन्क्वेलिम (Sanquelim) मतदार संघातल्या एका शाळेला भेट दिली व ही मोहीम गोवा राज्यातील सर्व शाळांत राबवण्याचे वचन दिले. एससीईआरटीचे संचालक श्री. नागराज हुन्निकेरी, शिक्षणसंचालक श्री. शैलेश झेंगडे प्रथम बुक्सच्या स्टोरीविव्हर मंचाच्या वरिष्ठ संचालक पूर्वी शहा या साऱ्यांनी शाळांमध्ये आनंददायक वाचनाची संस्कृती विकसित करण्याच्या महत्त्वाबद्दल आपले विचार मांडले.


राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२०मध्ये सन २०२५पर्यंत सर्व मुलांमध्ये प्रारंभिक साक्षरता निर्माण होण्याचे उद्देश्य साध्य करण्याकरता शाळांमध्ये असणाऱ्या सुसज्ज ग्रंथालयांचे व डिजीटल रूपातील ग्रंथालयांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलेले आहे. देशभर वाचनसंस्कृतीचा विकास व्हावा याकरता सर्व स्थानिक भाषांमध्ये उत्तम गुणवत्ता असणारे मुलांसाठीचे साहित्य उपलब्ध करून दिले जावे असे त्यात सुचवलेले आहे. अगदी बालवयापासूनच वाचनाचा आनंद घेण्याची सवय विकसित होण्याकरता शाळेत विशिष्ट तास राखून ठेवण्याबद्दलही या धोरणात सांगितलेले आहे. मुलांच्या वाढीमध्ये आणि विकासामध्ये गोष्टी आणि वाचन यांचा महत्त्वाचा वाटा असतो. मुलांच्या शब्दसंग्रहाचे संवर्धन व्हावे, वेगवेगळ्या गोष्टी आणि स्वतःचे आयुष्य यांमधला नातेसंबंध कळावा आणि वेगवेगळ्या गोष्टींबद्दल लोक कसा विविध प्रकारे विचार करतात हे त्यांना समजावे हा त्यामागचा उद्देश आहे. जी मुले वाचू शकतात, ती अधिक प्रमाणात विचार करू शकतात. त्यांची स्वतःची अभिव्यक्ती अधिक मोकळी असते. ती स्वतंत्रपणे अध्ययन करू शकतात.


शिक्षण संचालनालय, गोवा NEPची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि प्रत्येक मुलामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे. गोव्यातील मुलांनी वाचावे यासाठी ‘गोवा इज रीडिंग’ ही मोहीम प्रथम बुक्सचा स्टोरीविव्हर मंच आणि इंडस टॉवर्स यांच्या सहकार्याने इंग्रजी, मराठी आणि कोकणी भाषांतील डिजिटल आणि ऑफलाइन संसाधनांचे समृद्ध भांडार उपलब्ध करून देईल.
-नागराज होन्नेकेरी,संचालक, एससीईआरटी

गोवा राज्याच्या शिक्षण संचालनालयाच्या सोबत सहयोग करण्यात आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. इंडस टॉवरने याकरता सहयोग केला आहे. गोवा राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या ‘गोवा वाचतो आहे’ या कार्यक्रमाअंतर्गत डिजिटल आणि मुद्रित स्वरूपातल्या गोष्टीच्या पुस्तकांच्या माध्यमातून व या अनोख्या उपक्रमातून हजारो मुलांना वाचनाचा आनंद मिळेल. त्यातून ‘प्रत्येक मुलाच्या हाती पुस्तक’ या आमच्या उद्देशाला आणखी पुढे नेता येईल.
– हिमांशू गिरी, सीईओ, प्रथम बुक्स


गेल्या काही वर्षांमध्ये मोबाईल टॉवरच्या माध्यमातून इंटरनेट जोडणीचा विस्तार वाढल्याने शिक्षण व तंत्रज्ञान यांची उपलब्धता वाढलेली आहे. इंग्रजी मराठी आणि कोकणी या भाषेतील मुद्रित व डिजिटल गोष्टीची पुस्तके मुलांना उपलब्ध करून त्यांच्यामध्ये वाचनसंस्कृती रुजवण्याच्या प्रयत्नासाठीच्या ‘गोवा वाचतो आहे’ या मोहिमेबद्दल आम्ही गोवा सरकारचे अभिनंदन करतो. इंडस टॉवर्सच्या व्यापक सामाजिक जबाबदारीबाबतच्या कार्यक्रमांतर्गत शिक्षण आणि कौशल्य विकसन यांवर भर दिला जातो. ऑनलाईन व ऑफलाइन माध्यमाचा वापर करून हजारो मुलांमध्ये वाचन संस्कृती घडवण्याची क्षमता असणाऱ्या या सक्षम कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे.
– दिनेश अरोरा, मंडल सीईओ, महाराष्ट्र आणि गोवा मंडल, इंडस टॉवर्स लिमिटेड.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!