गोवा 

5 सप्टेंबरपासून राष्ट्रपती तीन दिवस गोव्यात

पणजी:
राष्ट्रपती रामनाथ कोविंद 5 सप्टेंबरपासून तीन दिवसांच्या राज्य भेटीवर येणार आहेत. त्यांचा हा दौरा प्रशासकीय विशेषतः राजभवनावरील अधिकाऱ्यांना धडकी भरवणारा ठरत आहे. राष्ट्रपतींचे वास्तव्य दोनापावल येथील राजभवन येथे असणार असल्याने जीर्ण झालेल्या राजभवनाच्या इमारतीला नवी झळाळी देण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर करण्यात येत आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तांत्रिक विभागाने केलेल्या पाहणीत राजभवनाची वास्तू कमकुवत झाल्याचे आढळले होते. त्यामुळे सरकारने नवे राजभवन बांधण्याचा विचार बोलूनही दाखवला होता. सरकार आर्थिक अडचणीत असताना नवे राजभवन का, असा सूर जनतेतून उमटू लागल्याने सरकारने पाऊल मागे घेत नवे राजभवन न बांधता सध्याच्या राजभवन इमारतीची आवश्यक ती दुरुस्ती व डागडुजी करण्याचे ठरवले होते.

राष्ट्रपतींच्या मागील दौऱ्यावेळी विजेचा एक दिवा तुटून पडला होता. त्यामुळे याखेपेला तशा गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासन धास्तावले आहे. राजशिष्टाचारानुसार राष्ट्रपती राज्याच्या दौऱ्यावर येतात त्यावेळी त्यांचा मुक्काम राजभवनावरच असतो. त्यामुळे राष्ट्रपती राहणार असलेल्या वास्तूसह त्यांच्यासोबत येणारा सेवक वर्ग राहणार असलेल्या जागीही डागडुजी करण्यात येत आहे. या साऱ्यांचा आढावा घेण्यासाठी राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची आज राजभवनावर बैठक घेऊन साऱ्या गोष्टींचा आढावा घेतला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: