Home

पृथ्वीचा ‘शॉ’नदार विक्रम… 

आयपीएलमध्ये सलग सहा चौकार मारणारा पहिलाच खेळाडू

चेन्नई : 
शुबमन गिल व आंद्रे रसेल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सनं ( KKR) २० षटकांत ६ बाद १५४ धावा उभ्या केल्या. पण, दिल्ली कॅपिटल्सनं ( DC) पहिल्याच षटकात धमाका उडवून दिला. शिवम मावीच्या त्या षटकात पहिला चेंडू वाईड गेल्यानंतर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यानं पुढील सहा चेंडूंत सलग सहा चौकार खेचले. आयपीएलच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच षटकात सहा चौकार खेचणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. शिवाय धावांचा पाठलाग करतानाही असा पराक्रम कोणत्याच फलंदाजानं केला नव्हता. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत पृथ्वीच्या नेतृत्वाखाली शिवम मावी खेळला होता आणि आज त्याची धुलाई झाली.  याआधी अजिंक्य रहाणेनं २०१२मध्ये एका षटकात सलग सहा चौकार खेचले होते. पहिल्या षटकात सर्वाधिक २४ धावांचा विक्रमही पृथ्वीनं नावावर केला.
दिल्ली कॅपिटल्सनं ( DC) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.  नितीश राणा ( १५) याला अक्षर पटेलनं चौथ्याच षटकात माघारी पाठवून कोलकाता नाईट रायडर्सला ( KKR) धक्का दिला. राहुल त्रिपाठी ( १९) याला मार्कस स्टॉयनिसनं, तर  कर्णधार इयॉन मॉर्गन ( ०) व सुनील नरीन ( ०) यांना ललित यादवनं माघारी पाठवून KKRचा निम्मा संघ ८२ धावांवर तंबूत पाठवला. शुबमन गिल आज फॉर्मात दिसला, परंतु त्याला अर्धशतकाच्या उंबरठ्यावरून माघारी फिरावे लागले. आवेश खाननं त्याची विकेट घेतली. गिलनं ३८ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ४३ धावा केल्या.
१५ षटकांत KKRनं ५ बाद ९५ धावा केल्या असताना मैदानावर आंद्रे रसेल व दिनेश कार्तिक ही सर्वात अनुभवी जोडी फटकेबाजी करताना दिसली. पण, १७व्या षटकात अक्षर पटेलच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात कार्तिक ( १४) बाद झाला. आंद्रे रसेल व पॅट कमिन्स यांनी संघर्ष करताना KKRला २० षटकांत ६  बाद १५४ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. आंद्रे रसेल २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४५ धावांवर नाबाद राहिला. पॅट कमिन्सनं ११ धावा केल्या.
prithvi shaw

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: