सिनेनामा

रवैल यांनी घडवली रुमानी सिनेसफर

पणजी :
1970 च्या काळाने हिंदी चित्रपट क्षेत्रात नव्या कल्पना, नवे प्रयोग, नव्या जॉनरचे एक्शन चित्रपट अनुभवले. चाकोरीबाहेरच्या चित्रपटांचाही तो सुवर्णकाळ आणि नव्या तंत्राचाही उदयकाळ असल्याचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते राहुल रवैल यांनी म्हटले आहे. 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इफ्फीच्या ‘इन कन्व्हरसेशन’ या ऑनलाईन सत्रात ते ‘50, 60 आणि 70 या काळातली चित्रपट निर्मिती’ या विषयावर बोलत होते. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या परिवर्तनाचा मनोहारी प्रवास त्यांनी प्रतिनिधींना घडवला.

60 च्या उत्तरार्धात आपण हिंदी चित्रपट उद्योगात काम करायला सुरवात केली, या क्षेत्रातले दिग्गज राज कपूर यांचे सहाय्यक म्हणून कारकिर्दीला प्रारंभ केल्याचे रवैल यांनी आपला चित्रपट प्रवास उलगडताना सांगितले. 60 मध्ये के असिफ आणि मेहमूद यांच्यासारख्या मान्यवरांनी भव्य सेट सह चित्रपट निर्मिती केली. त्यानंतर 70 मध्ये चित्रीकरण स्थळी 25-30 दिवसात चित्रीकरण करत बाबुराम इशारा यांच्या ‘चेतना’ ने क्रांती घडवली. त्या काळात ही बाब असाधारण होती.

देव आनंद अभिनित ‘जॉनी मेरा नाम’ या विजय आनंद यांच्या चित्रपटाने एक्शनवर भर असलेल्या नव्या स्वरूपातल्या मोठ्या चित्रपटांचा उदय झाला. 70 च्या सुवर्णकाळात हिंदी चित्रसृष्टीची जोमाने वाढ होत असताना ‘जंजीर’ या चित्रपटात अमिताब बच्चन यांनी साकारलेला ‘चाकोरीबाहेरचा हिरो’ या जगताने पाहिला. यातून ‘एंग्री यंग मेन’ ही नवी संकल्पना उदयाला आली. 1973 मध्ये आलेल्या ‘यादों की बारात’ या चित्रपटाने सलीम-जावेद यांनी आणलेले महान कथानक पाहिले. ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांना घेऊन राज कपूर यांनी केलेल्या ‘बॉबी ‘चित्रपटानेही नवा प्रवाह आणल्याचे रवैल म्हणाले.

ऋषी कपूर यांचे स्मरण करत त्यांना त्यांच्या प्रतिभेच्या तुलनेत प्रशंसा कमी लाभल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं. जितेंद्र यांनीही नवी शैली, नवे अपील हिंदी चित्रपटांत आणल्याचे त्यांनी सांगितले. दीवार या चित्रपटाने यश चोप्रा यांना शिखरावर नेले असे सांगून यश चोप्रा यांनी त्यानंतर त्रिशूल सारखे अविस्मरणीय चित्रपट तयार केल्याचे ते म्हणाले.

lvprasad

एल व्ही प्रसाद यांच्या ‘एक दुजे केलिये ’या यशस्वी चित्रपटाबाबतही रवैल यांनी विचार व्यक्त केले. या चित्रपटात नायकाला हिंदी भाषा येत नाही तो केवळ तमिळ बोलतो आणि नायिका केवळ हिंदी बोलते तिला तमिळ येत नाही अशी प्रेमकथा होती. या क्षेत्रातले लोक नवे विषय शोधून वेगवेगळे काम करत होते असे त्यांनी सांगितले.

प्रेक्षकही नव्या प्रकारचे सिनेमे अनुभवत होते. 80 मध्ये नवे लोक आले आणि आधीचे दिग्गजांनीही काम सुरु ठेवले. याकाळात सुभाष घई, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह इतर दिग्गज आले. रवैल यांनी अर्जुन चित्रपट केला आणि कथानक नव्हे तर व्यक्तिरेखेचे प्राबल्य असलेल्या चित्रपटांचा जमाना आला. अर्जुन साठी जावेद अख्तर यांनी सलग 8 तास कथानक लिहिले याची आठवण त्यांनी सांगितली.

खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणार्‍या अमजद खान यांना रवैल यांनी विनोदी भूमिकेसाठी निवडले. या निर्णयाबाबत काहींनी शंका उपस्थित केली, मात्र महान कथानक नेहमीच चालते हा आपले गुरु राज कपूर यांचा मंत्र लक्षात ठेवून त्यांनी निर्णय घेतला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: