महाराष्ट्र

राजीव सातव यांना मान्यवरांची श्रद्धांजली

मुंबई  :
काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांचे पुण्यात निधन झाले. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्यानं त्यांची प्रकती बिघडली आणि रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शोकभावना व्यक्त केल्या आहेत. “महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे,” असं म्हणत पवार यांनी सातव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राजीव सातव यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करून सातव यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. “काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

खा. राजीव सातव यांच्या निधनाने तरुण, कर्तृत्वान नेतृत्व गमावले

खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक तरुण, निष्ठावान, कर्तृत्ववान, अभ्यासू, प्रचंड क्षमता असलेला उमदा नेता गमावला असून काळाने माझा भाऊ हिरावून घेतला आहे. अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. खा. राजीव सातव यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, राजीव सातव यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. काँग्रेस विचारांवार त्यांची प्रचंड श्रद्धा आणि निष्ठा होती. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, गुजरातचे प्रभारी म्हणून पक्षसंघटनेत त्यांनी मोलाचे योगदान दिले. अत्यंत मनमिळावून स्वभाव व कुशल संघटक असणा-या राजीव सातव यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तरुणांची मोठी फळी राजकारणात उभी केली.
कोरोनावर मात करुन ते पुन्हा उभारी घेतील असे वाटत असतानाच आज सकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून निशब्द झालो. त्यांचे निधन काँग्रेस पक्षासाठी व वैयक्तीक आपल्यासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची व वैयक्तीक माझी कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.

प्रतिभाशाली उमदे नेतृत्व हरपले!

आमचे सहकारी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा. राजीव सातव यांचे अकाली निधन अतिशय वेदनादायी असून, नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक यांनी म्हटले आहे. खा. सातव यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, जिल्हा पातळीपासून राजकीय प्रवास सुरू करून विलक्षण जिद्द व कर्तबगारीच्या बळावर अतिशय कमी वेळेत राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करणारे खा. राजीव सातव यांच्याबद्दल संपूर्ण देशात कुतूहल होते. महाराष्ट्रासाठी ते एक अभिमान होते. पुढील काळात देश व काँग्रेस पक्षासाठी त्यांच्याकडून मोठे योगदान अपेक्षित केले जात होते.

खा. राजीव सातव यांचे निधन काँग्रेस पक्षासाठी मोठी हानी आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण देशातील त्यांचा मित्र परिवार आणि चाहत्यांच्या मनात त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व सातव कुटुंबियाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

अभ्यासू, कार्यकुशल नेतृत्व गमावले 
काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे  मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: