देश-विदेशगोवा 

राजेंद्र आर्लेकर हिमाचलच्या राज्यपालपदी

पणजी: 
गोवा विधानसभेचे माजी सभापती व गोव्याचे माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले असे आर्लेकर यांनी म्हटले आहे.

आर्लेकर यांचे घराणे मुळापासून संघाचे आहे. त्यांचे वडील विश्वनाथ आर्लेकर यांनी व त्यांनी आणीबाणी काळात कारावासही भोगला आहे. आर्लेकर हे सुरुवातीला वास्को व नंतर पेडणे मतदारसंघातून गोवा विधानसभेत निवडून आले होते. त्यांनी सभापती व पंचायत मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.

हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर याविषयी आनंद व्यक्त करताना आर्लेकर म्हणालेत, केंद्रीय नेतृत्व सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून असल्यानं हा चमत्कार घडला असल्याचं माझं मत आहे. सोमवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अचानक मला फोन आला आणि त्यांनी मला ही आनंद वार्ता दिली. तसंच आज सकाळी राष्ट्रपती भवनातून मला फोन आला आणि स्वतः राष्ट्रपतींनी यासाठी माझं अभिनंदन केलं. हे पद मला मिळालंय हे मी माझं भाग्य समजतो.

या नव्या जबाबदारीविषयी बोलताना आर्लेकर म्हणाले, राज्यपाल पद हे मोठ्या जबाबदारीचं पद आहे. हिमाचल प्रदेश हे राज्य जरी छोटं दिसत असलं तरी राजकीय घडामोडींच्या दृष्टीकोनातून ते नेहमीच चर्चेत असतं. तिथे काय आव्हानं आहेत हे मला आज माहीत नाही, मात्र तेथील जनतेच्या सहकार्याने मी तेथील प्रश्नांना तोंड देऊ शकेन, तेथील समस्या सोडवू शकेन असं मला वाटतंय.

गोव्यात जन्मलेले आणि गोव्यातील राजकीय क्षेत्रात वावरलेले पहिले राज्यपाल म्हणून राजेंद्र आर्लेकर हे तसे पहिले गोंयकार आहेत. यापूर्वी मूळ गोमंतकीय असलेले जनरल सुनीथ फ्रांसिस रोड्रिग्स यांची पंजाबचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली होती. सुनीथ रॉड्रिगीस यांचा जन्म आणि शिक्षण हे मुंबईत झालं होतं, परंतु ते मूळ गोमंतकीय होते आणि गोव्यात वेगवेगळ्या सरकारी समित्यांवर त्यांनी काम केलं होतं.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी ट्विट करत राजेंद्र आर्लेकरांना शुभेच्छा दिल्यात. मुख्यमंत्री म्हणालेत, भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी सभापती आणि गोवा सरकारचे माजी मंत्री राजेंद्र आर्लेकरांचं हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. समस्त गोंयकारांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे.

हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी राजेंद्र आर्लेकरांचं अभिनंदन करताना ट्विट केलंय. राज्यपाल पदी राजेंद्र आर्लेकरांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. त्यांच्या नवीन भूमिकेसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा, असं तानावडे ट्विट करताना म्हणालेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: