गोवा 

स्वातंत्र्यसैनिक रमाकांत केसरकर यांचे निधनमडगाव:

गोवा मुक्ती चळवळीत भूमीगत राहून मोलाचे कार्य केलेले स्वातंत्र्य सैनिक रमाकांत दामोदर केसरकर (84) यांचे वृद्धापकाळाने आज 5 नोव्हेंबर रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर मठग्रामस्थ हिंदूसभेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र विक्रम यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.

त्यांच्या मागे पुत्र विक्रम व दामोदर, तसेच विवाहित कन्या तेजा विनायक डांगी व रूपा अमोल वेरेकर, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. केसरकर हे वृद्धापकाळाने मागचे काही महिने आजारी होते. आज पहाटे 4 च्या सुमारास त्यांचे देहावसान झाले अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयाकडून देण्यात आली.

त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच अन्य व्यक्ती हजर होत्या. स्वातंत्र्य सैनिक वामन प्रभुगावकर, 18 जून समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर व समितीचे अन्य सदस्य अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते.

रमाकांत केसरकर यांचा जन्म 11 जुलै 1937 रोजी झाला होता. विद्यार्थीदशेत असतानाच म्हणजे 1954 च्या दरम्यान ते गोवा मुक्ती चळवळीत सक्रिय झाले होते. उर्सेलीन आल्मेदा आणि विष्णू केसरकर यांच्या बरोबर ते भूमीगत राहून मुक्ती लढ्याचे काम करत असत. 15 ऑगस्ट 1955 या दिवशी मडगावात करण्यात आलेल्या सत्याग्रहात त्यांनी विष्णू केसरकर, शशी बोन्द्रे, आनंद भिसे, मोहन सावळ यांच्या बरोबर भाग घेतल्याने त्यांना पोलिसांनी अटक करून दोन दिवस डांबून जबरदस्त मारहाण केली होती.

केसरकर गोवा मुक्तीपर्यंत म्हणजे 1961 पर्यंत या लढ्यात सक्रिय होते. या मुक्तीलढ्याला अंतिम रूप देण्यासाठी पीटर अल्वारीस यांनी आंगडी कारवार येथे जी शिबीरे आयोजित केली होती त्या शिबिरांना ते हजर राहत. पीटर अल्वारिस यांच्या सूचनेप्रमाणे ते गोव्यात काम करत असल्याची कुणकुण पोर्तुगीज पोलिसांना कळल्यानंतर किमान 4 वेळा त्यांच्या घरावर धाड घालून त्याना अटक करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु ते भूमीगत झाल्याने पोलिसांच्या हाती लागू शकले नव्हते.

दरम्यान, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. गोवा मुक्ती लढ्यातील त्यांचे योगदान सदोदीत सर्वांच्या स्मरणात राहिल असे दिंगबर कामत यांनी म्हटले असुन, त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना कळवील्या आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: