महाराष्ट्रसातारा 

…अखेर सांडवलीचे होणार पुनर्वसन;  ‘राष्ट्रमत’च्या बातमीचा परिणाम 

आ. शिवेंद्रसिंहराजेंसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी केली गावाची पाहणी

सातारा (महेश पवार) :

अतिवृष्टीमुळे सांडवली ता. सातारा येथे डोंगरकडा अथवा दरड कोसळण्यासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. माळीण अथवा आंबेघरसारखी दुर्घटना सांडवली येथे घडल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. पुढील अनर्थ टाळण्यासाठी सांडवली गावठाणाचे पुनर्वसन लगतच्या पठारावर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला असून याबाबत तातडीने पुढील कार्यवाही करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या गावाबद्दल ‘राष्ट्रमत’ने सातत्याने बातम्या लावून प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता, त्यामुळे आज अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर ग्रामस्थांनी ‘राष्ट्रमत’चे आभार मानले आहेत.

अतिवृष्टीमुळे सातारा तालुक्यातील पांगारे धरण येथील खचलेला रस्ता, पळसावडे धरण, बोन्डारवाडी येथे झालेले नुकसान आणि सांडवली येथील नुकसान व डोंगरामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीची पाहणी आ. शिवेंद्रसिंहराजे आणि जिल्हाधिकारी सिंह यांनी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता महादेव धुळे, जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता सुनील कुशिरे, बांधकाम विभागाचे उप अभियंता राहुल अहिरे, प्रशांत खैरमोडे, विस्तार अधिकारी शंतनू राक्षे यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सांडवली ग्रामस्थांची गंभीर समस्या सोडवण्यासाठी गावठाणाचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात डोंगर कडा, दरड कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. प्रशासनाने तातडीने हालचाल करावी. पुनर्वसनासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यावेळी म्हणाले. गावठाण पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही करू असे जिल्हाधिकारी म्हणाले. तसेच खड्गाव पासून रस्ता रिंगरोडला जोडून हा भाग थेट परळीला जोडण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. पांगारे येथील खचलेल्या रस्त्याबाबत तोडगा काढण्यावरही सकारात्मक चर्चा झाली.

‘साहेब तुम्ही पहिलेच जिल्हाधिकारी..!’
अगदी स्वातंत्र्याच्या काळापासून सांडवली गावापर्यंत जिल्हाधिकारी पदाचा अधिकारी कधीही आला नाही. भाऊसाहेब महाराजांच्या काळात या भागात एकमेव अरुण भाटिया हे अधिकारी येऊन गेल्याची आठवण आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी करून दिली. तसेच सांडवलीमध्ये येणारे तुम्ही पहिलेच जिल्हाधिकारी आहात. स्वतः ग्रामस्थांच्या समस्येत लक्ष घातले, पाहणी केली आणि प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल  आ. शिवेंद्रसिंहराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: