गोवा 

मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची मागणी

मडगाव :
बेजबाबदार भाजप सरकारने गोव्याला कोविडच्या मृत्यू  विळख्यात लोटले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या करोना रुग्णांचा आरोग्य सुविधेअभावी मृत्यू होत आहे. अशा स्थितीत गोव्याचे बेजाबदार मुख्यमंत्री लॉकडाऊनची गरज नसल्याचे सांगत आहेत. डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करुन त्यांना गजाआड होण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
आज निवासी डॉक्टरांच्या व्हायरल झालेल्या एका पत्राने गोमेकॉतील भीतीदायक स्थिती उघड झाली आहे. या निवासी डॉक्टरांनी गोमेकॉ अधिष्ठाता यांना लिहिलेल्या पत्रात इस्पितळातील अनागोंदीची माहिती दिली आहे. त्यातून अनेक कोविड कक्षात ऑक्सिजन पुरवठाच होत नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी हवी असलेली केंद्रीय पद्धती तसेच व्हेंटीलेटर सह इतरही वैद्यकीय उपकरणे  उपलब्ध नाहीत. अशा कोविड कक्षातील रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी युवक काँग्रेस पदाधिकारी ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी धडपडत असतांना सरकारची पोलीस यंत्रणा त्यांचा छळ करत आहे. अशाही स्थितीत आमचे कार्यकर्ते काम करीत आहेत.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील कोविड कक्षाची परिस्थिती देखील याच स्वरूपाची आहे. यावरून हे स्पष्ट होत आहे की, डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी गंभीर अडचणींचा सामना करत असतांना सरकारला मात्र त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. खरे तर या सर्वांना सुरक्षा पुरविणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे  चोडणकर यांनी म्हटले आहे.
congressभांडवलदारांचेच हित पाहणार्‍या भाजप सरकारने दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील दोन रिकामे मजले अजून ताब्यात घेतलेले नाहीत. सरकारला ही कामे त्यांच्या खाजगी साथीदारांकडे सोपऊन त्यांचे भले करायचे आहे. करोना रुग्ण आजही जमिनीवर व मिळेल त्या जागेवर उपचार घेत आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आणि रुग्ण यांचे सँडविच होत आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांच्या भांडणामधे कोविड रुग्णांना खाटा आणि ऑक्सिजन मिळणे अशक्य झाले आहे. त्या मुळे निरपराध कोविड रुग्णांच्या सदोष मनुष्य वधाबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची गरज आहे, असे चोडणकर म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: