गोवा 

‘…नाहीतर ‘आप’ने गोव्यातून गाशा गुंडाळावा’

पणजी (प्रतिनिधी )
दिल्लीची राजनीती गोव्यात नकोच मुळी. गोव्याची राजनीती गोव्यात चालवायला आम्ही पूर्ण समर्थ आहोत. स्वतःला स्वच्छ राजकारणी म्हणविणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पूर्ण खोटारडे आहेत.असे प्रतिपादन रिवोलूशनरी गोवनचे नेते मनोज परब बुधवारी १४ जुलै रोजी सायंकाळी करंजाळे पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. यावेळी राजेश रेडकर, रोहन कलांगुटकर, विरेश बोरकर उपस्थित होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आगामी विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाच्या गोवाभेटी वर आले होते.परंतु त्यांनी पत्रकारांचीही पर्वा केली नाही. त्यांच्या प्रश्नांचीही योग्य उत्तरे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल देवू शकले नाहीत. त्यामुळे रिवोलूशनरी गोवन्सतर्फे पत्रकार परिषद घेवून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गोव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगण्यात आले आहेत. ह्या प्रश्नांची योग्य उत्तरे देता येत नसेल तर त्यांनी आपला गोव्यातून गाशा गुंडाळावा, असे सुनावले आहे.

‘गोवन ‘( गोवेकर) संदर्भात आप ची व्याख्या काय आहे? गोव्यात मोफत वीज पुरवठा कुणाला करू पाहताय, गोमंतकीयांना की बिगर गोमंतकीयांना? गोव्यात बिगर गोमंतकीयांच्या किती अनधिकृत झोपड्या, घरे,व्यवसाय, कारखाने आहेत? याचे कधी सर्वेक्षण केले आहे का? वीज बिल ही गोमंतकीयांना भेडसावणारी मुख्य समस्या नाही. गोमंतकीयांचे अस्तित्व, संस्कृती, वारसा परंपरा, रोजगार (नोकऱ्या), जमिनी, हक्क यांच्यावर आलेले संकट ह्या मुख्य समस्या आहेत. या सर्वावर बिगरगोमंतकीय गोव्यात येऊन कब्जा करू लागले आहेत, असे मनोज परब यावेळी म्हणाले.

गोव्यात असंख्य बोगस मतदारकार्ड आहेत. त्यावर केजरीवाल यांची भूमिका काय आहे? त्यांना तुम्ही पाठींबा देताय की त्या बोगस मतदारकार्डांवर कारवाई करणार? दिल्लीवाले गोव्यात येवून येथील राजकर्त्यांशी हातमिळवणी करून जमिनी रूपांतरित करून घेतात. त्यावर इमारती बांधतात. परंतु गोवेकर त्या विकत घेऊ शकत नाहीत.असे ते बोलताना म्हणाले.

ढवळीकर बंधूंना भेटण्यास आपणास लाज कशी वाटली नाही. त्यांच्यासोबत कशी काय चर्चा करण्यास बसलात? सुदिन ढवळीकर यांच्यावर २०१५ साली बोगस पदवी म्हणून आपतर्फे खटला दाखल केला होता, त्याचे पुढे काय झाले, कुणाला माहीत नाही. १४ डिसेंबर २०१६ रोजी भाजपा व मगोप समान भ्रष्टाचारी असे व्यक्तव्य आपने केले होते.मग भ्रष्टाचारी ढवळीकर बंधू सोबत आपण सिदाद द गोवामध्ये कसे काय बसलात? असे अनेक प्रश्न मनोज परब यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विचारले आहेत.

आपने गोव्यात केक वाटण्याची मोहीम सुरू केली आहे. हे केक प्रथम आप च्या तिकिटावर  निवडून येवून नंतर काँग्रेसमध्ये गेलेल्या त्या चार पंजाबच्या आमदारांना द्यायला हवेत. आपतर्फे फक्त भ्रष्टाचारी उमेदवारांना तिकीट देतात. उगाच काहींची बदनामी करतात.व त्यांनी बदनामी खटला भरल्यावर त्यांची माफी मागतात, असे हे मुख्यमंत्री केजरीवाल. स्वतःला स्वच्छ राजकारणी म्हणणाऱ्या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या ३८ आमदारांवर भीषण गुन्हे नोंद आहेत. त्यांचे ७३ टक्के आमदार हे करोडपती आहेत. ते केवळ पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकतात, असे मनोज परब पुढे बोलताना म्हणाले.

दिल्लीत चर्च पाडून केजरीवाल नियोजनबद्धरित्या गोव्यात आले. गोव्यात त्या संदर्भातील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देवू शकले नाहीत. गोव्यातील कोळसा वाहतुकीसंदर्भातील प्रश्नाचे ही पत्रकारांना केजरीवाल उत्तर देऊ शकले नाहीत. केवळ स्वतःचे प्रदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. अरविंद केजरीवाल स्वतःला समजतात तरी कोण? असे मनोज परब म्हणाले.

केजरीवाल हे गोव्यात मते फोडून भाजपा उमेदवारांना विजयी करण्यासाठी आले आहेत.असे ते बोलताना म्हणाले.

गोव्यात सद्या जे आपतर्फे रेशन वितरण केले जाते. त्यासाठी अनेक भाड्याच्या रिक्षा वापरल्या जातात. यासाठी आपकडे पैसा कुठून आला. आपचा गोव्यात एकही पदाधीकारी योग्यतेचा नाही. आपच्या खोटारडेपणाला गोमंतकीयांनी फसू नये. गोव्यात येत्या विधानसभा निवडणुकीत आपचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. आपने ‘आरजी’च्या सर्व शंकांचे निरसन करावे. दिल्लीतून गोव्याचे भविष्य ठरविणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोण? असा प्रश्न यावेळी मनोज परब यांनी उपस्थित केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: