मुंबई 

थुंकणाऱ्यांकडून वसूल केले तब्बल २८ लाख रुपये

मुंबई :
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सुविधा देणारी महानगरपालिका आपल्या क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी देखील नियमितपणे घेत असते. या अंतर्गत आरोग्य सुविधा देण्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंबही सातत्याने करण्यात येतो. याच अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना, क्षयरोग यासारख्या विविध रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर महापालिकेद्वारे रुपये २००/- एवढा दंड सध्या आकारण्यात येत आहे. मात्र, ही रक्कम गेल्या अनेक वर्षांपासून रुपये २००/- इतकीच असल्याने या रकमेत वाढ करण्याची बाब प्रशासनाच्या विचाराधीन आहे. या अनुषंगाने ही दंड रक्कम वाढविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या प्रशासकीय प्रस्तावास महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. यानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात आवश्यक ती पुढील कार्यवाही महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत आहे, अशी माहिती उप आयुक्त संजोग कबरे यांनी दिली आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर महापालिकेद्वारे दंडात्मक कारवाई नियमितपणे करण्यात येते. या कारवाई अंतर्गत गेल्या सुमारे ७ महिन्यात १४ हजारांपेक्षा अधिक व्यक्तिंकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्ल तब्बल रुपये २८ लाख ६७ हजार ९०० इतकी दंड वसुली करण्यात आली आहे. याबाबत एका जनहित याचिकेच्या प्रकरणी मा. उच्च न्यायालयाद्वारे देण्यात आलेल्या आदेशांनुसार ही कारवाई अधिक तीव्र करण्यासोबतच प्रभावी जनजागृती करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. तरी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वावरताना आवर्जून मुखपट्टी (मास्क) वापरावी, वारंवार हात धुवावेत किंवा सॅनिटाईज करावेत आणि दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन, मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम ४६१ अंतर्गत ‘बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी – २००६’ तयार करण्यात आले आहेत. या नियमांची अधिकाधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय कार्यवाही करीत असते. याच उपविधीतील क्रमांक ४.५ नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या व्यक्तिंकडून रुपये २००/- इतकी दंड वसुली करण्यात येते. यानुसार गेल्या सुमारे ६ महिन्यांच्या कालावधीत रुपये २८ लाख ६७ हजार ९०० इतकी दंड वसुली करण्यात आली आहे. या अंतर्गत सर्वाधिक दंड वसुली ही प्रामुख्याने कुर्ला परिसराचा समावेश असलेल्या ‘एल’ विभागातून करण्यात आली असून, ती रुपये ०४ लाख ७० हजार २०० इतकी आहे. या खालोखाल ‘ए’ विभागातून रुपये ०३ लाख २९ हजार ८००, तर ‘सी’ विभागातून रुपये ०२ लाख ७१ हजार ४०० इतकी दंड वसुली करण्यात आली आहे.
..
महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी थुंकत असल्याचे आढळून आलेल्या व्यक्तिंकडून ‘प्रति व्यक्ती, प्रति घटना’ रुपये २००/- इतका दंड वसूल करण्यात येतो.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: