google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

बिबट्याच्या फोटोची नामी शक्कल ; सज्जनगडावरून माकडे झाली पसार

सातारा (महेश पवार) :

धार्मिक एक दिवसाच्या पर्यटनासाठी आणि धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या सज्जनगडावर सध्या राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींचा 341 वा पुण्यतिथी महोत्सव अर्थात दास नवमी उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे.

सज्जनगडावर दर्शनासाठी तसेच निवासासाठी येणाऱ्या सर्व समर्थ भक्तांना एक वेगळाच सुखावह अनुभव मिळत आहे तो म्हणजे सज्जनगडावर असलेल्या आपल्या मरकटलीलांनी भंडावून सोडलेल्या माकडांपासून पूर्ण सज्जनगड मुक्त झाला आहे .आणि याचे कारण आहे… बिबट्या .


ऐकून नवल वाटेल ,मात्र गेले दोन-तीन महिने सज्जनगड आणि परिसरातील गावातून बिबट्या आणि त्याची दोन पिल्ले संचार करत आहेत. सज्जनगडावरील निसर्गरम्य वातावरणात हा बिबट्या फिरत असल्याचे अनेकदा अनेक ग्रामस्थांनी पाहिले. अगदी ही बातमी तयार करतानाही मंगळवारी सकाळी सज्जनगड बसस्थानकाजवळ असलेल्या भातखळ्याच्या पाठीमागे बिबट्या ग्रामस्थांच्या नजरेत पहाटेचा दिसून आला आणि त्यामुळे रामदास स्वामी संस्थांननी येथे गडावर येणाऱ्या लोकांना सजग करण्यासाठी बिबट्या पासून सावध रहा अशा आशयाचे फलक लावले .मात्र या फलकांचा उपयोग तसा काहीसा झालाच नाही. त्यानंतर संस्थांनचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद स्वामी यांच्या संकल्पनेतून आजूबाजूला एकट्या- दुकट्याने जाऊ नये म्हणून परिसरात आणि समाधी मंदिराच्या बाजूला बिबट्याचा भव्य चेहऱ्याचा फ्लेक्स उभारला.


खरे पाहता हा फलक भक्तांना जाणीव करून द्यावी की या परिसरात बिबट्या आहे यासाठी होता , मात्र याचा परिणाम उलटाच झाला. आणि हा बिबट्याचा प्रचंड भीती वाटणारा आणि डोळे रोखलेला फोटो पाहून सज्जनगडावर असलेली सुमारे शंभर माकडांची टोळी मात्र हा भीतीदायक फोटो पाहून घाबरून त्याच्या नजरेला नजर न देता समाधी मंदिर परिसरातून कायमची निघून गेली.


नाही तर गेले दोन ते तीन वर्षे या माकडांनी उच्छाद मांडला होता .सज्जनगडावर एसटी स्टँड पासून पायऱ्यांवरून येत असताना छत्रपती शिवाजी महाद्वार, समर्थ महाद्वार या परिसरातील पायऱ्यांवर तेथे असलेल्या छोट्या विक्रेत्यांना ही माकडे प्रचंड सतावत होती. या परिसरातून जाणाऱ्या भक्तांच्या पिशव्या उचकणे ,मोबाईल पळवणे, हातातील वस्तू घेऊन धुम ठोकणे, वस्तू नासाडी करणे अशा प्रकारच्या त्रासांमुळे सज्जनगडवासी अतिशय त्रस्त झाले होते .समाधी मंदिर परिसरात लावलेला बिबट्याचा फलक एक चांगली नामी शक्कल असल्याचे लक्षात आल्यावर संस्थांनच्या वतीने असे बिबट्याचे चेहरे असलेले फ्लेक्स धाब्याचा मारुती, पिण्याचा पाण्याचा तलाव तसेच सज्जनगडावरील अंगलाई देवी मंदिर आणि लोकमान्य टिळक प्रवेशद्वारापाशी लावण्यात आले.


या फलकाचा नामी उपाय अतिशय तंतोतंत ठरल्यामुळे परिसरातून सर्वच माकडे अचानक गायब झाली आणि सज्जनगड वर राहणाऱ्या सर्वच निवासी भक्तांनी अक्षरशः सूस्कारा सोडला. सध्या मंदिराच्या परिसरात शेजघराजवळ पाहायला मिळणारा बिबट्याचा भव्य फोटो तसेच एलईडी प्रक्षेपणाद्वारे सुरू असलेले संस्थांचे कार्य पाहता पाहता त्या एलईडीवरही अचानक बिबट्या पाहायला मिळतो .अशा प्रकारचे हे फलक आता गडावरील गवताळ भागात जेथे माणसांचा वावर कमी आहे तेथे लावण्याचाही मानस दुर्गाप्रसाद स्वामी यांनी व्यक्त केला आहे.संस्थांनचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद स्वामी यांनी सांगितलेले ही माकडे हटवण्याची अजब युक्ती मात्र ऐकल्यावर चेहऱ्यावर हसू उमटणारी ठरत आहे .त्यामुळे आता सज्जनगडावर माकडांच्या चाळयापासून निर्धास्त रहात ,बिनधास्त या आणि समर्थ समाधीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा आनंद लुटा असे आवाहनच संस्थांनच्या वतीने करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!