सातारा 

रक्ताचा कर्करोग आणि कोविडवर रुग्णाने केली यशस्वी मात

सातारा (महेश पवार) :
येथील ३३ वर्षीय  तरुणाला सांगलीहून साता-यातील  खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले, कारण त्याला रक्ताच्या कर्करोगाची शक्यता होती. तेथे त्याचा कोविड १९चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तसेच त्याच्या लाल पेशी व प्लेटलेट्स फारच कमी होत्या व त्यामानाने पांढ-या पेशी खुपच वाढलेल्या होत्या. त्याला तोंडावाटे रक्तस्राव होत होता व सतत ताप येत होता.
ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर चे हिमॅटोलॉजिस्ट डॉ विनोद पाटील यांनी त्याची तपासणी केली तसेच रक्ताच्या चाचण्या केल्या. यामध्ये त्याला अक्युट प्रोमायलोसायटीक ल्युकेमिया या आजाराची दाट शक्यता वर्तविण्यात आली. हा आजार रक्ताच्या कर्करोगात मोडत असून रुग्णाच्या जीवाला मोठ्या प्रमाणात धोका असतो. ज्यात प्रामुख्याने रक्तस्राव, रक्तसंसर्ग आणि डिफरन्टशीऐशन सिंड्रोम ही कारणे महत्त्वाची ठरतात. या प्राणघातक रक्त कर्करोगाबरोबरच रुग्णाला कोविड संसर्ग देखील झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली त्यामुळे रुग्णावर उपचार करण्याचे डॉ विनोद पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान  होते.

रुग्णाच्या नातेवाईकांना आजाराची पुर्ण कल्पाना देऊन बोन मॅरो चाचणी करण्यात आली. रुग्णाला किमोथेरपी व रक्तघटक चढविण्यात आले त्याचबरोबर कोविडची औषधे देखील सुरु ठेवण्यात आली. यादरम्यान रुग्णाच्या डोळ्यात रक्तस्राव झाल्याने त्याची नजर अंधुक झाली. रुग्णाला व्हिटामिन सी चा डोस सुरु करण्यात आला. रुग्णाला पुढील उपचाराकरिता साता-यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर येथे दाखल करण्यात आले. रुग्णाची एचआरसीटी चाचणी करण्यात आली आणि या चाचणीचा स्कोअर ११ होता. कोविडची योग्य ती काळजी घेत त्याचे कॅन्सरचे उपचार सुरु ठेवण्यात आले. यादरम्यान रुग्णाचा तोंडावाटे रक्तस्राव सुरु होता त्यामुळे त्याला आवश्यक रक्तघटक व लाल पेशी चढविण्यात येत होत्या.

दरम्यान, रुग्णाचा कोव्हिडचा आजार मर्यादित राहिला व त्याचा कर्करोग केमोथेरपीला योग्य प्रतिसाद देऊ लागला. केमोथेरपीचे त्याच्या हृदयावर दुष्परिणाम दिसून येऊ लागले आणि त्यामुळे काही काळ औषधे बंद करण्यात आली. चार आठवड्यानंतर त्याची कोविड चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर काही दिवसांनी त्याला घरी देखील सोडण्यात आले. पहिल्या केमोथेरपीनंतर त्याचा बोनमॅरो तपासण्यात आला व त्याचा कर्करोग नियंत्रणात आल्याचे दिसून आले. त्याची कॅन्सरची आरटीपीसीआर चाचणी देखील निगेटिव्ह आली. अशा प्रकारे रुग्णाने कोविड १९ आणि कर्करोग या दोन्हींवर यशस्वीरित्या मात केली.
या रुग्णावरील उपचारादरम्यान डॉ विनोद पाटील यांना, उदय देशमुख, प्रतापराजे महाडिक, डॉ सुरेश शिंदे, डॉ विकास पाटील व ऑन्को लाईफ़ हॉस्पिटल चे रेसिडेंट डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचा-यांची मोलाची साथ लाभली.रुग्ण आता दुसऱ्या किमोथेरेपिलाही योग्य प्रकारे प्रतिसाद देत आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: