गोवा 

‘लोकांचे प्राण वाचविण्याला असावा प्राधान्यक्रम’

पणजी :
गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसने कोविड रूग्णांच्या मदतीसाठी आपल्या सेवांचा विस्तार करत शुक्रवारी कोविड रूग्णांना  रुग्णालयात नेण्यासाठी व ऑक्सिजन सिलिंडर्सची वाहतूक करण्यासाठी दोन वाहने सुरू केली. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, जीपीसीसीचे  अध्यक्ष गिरीश चोडणकर, युवक कॉंग्रेसचे  अध्यक्ष अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर, कॉंग्रेस नेते जोएल आंद्रादे आदी उपस्थित होते. पणजी येथील कॉंग्रेस हाऊसजवळ या सेवेची सुरुवात केली.
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी युवक कॉंग्रेसच्या कार्याचे कौतुक केले आणि म्हणाले की ते कठीण काळात लोकांची मदत करत आहेत. “गोवा कोविड संकटात सापडला आहे, परंतु भाजप सरकारने परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. अनेक ज्येष्ठ नागरिक रुग्णालयात भेट देण्यासाठी मदतीची अपेक्षा करीत आहेत, कारण त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही. यासाठी युवक कॉंग्रेस आशेचे किरण बनली आहे. ” असे कामत म्हणाले. कामत म्हणाले की या कोविड परिस्थितीत लोकांचे प्राण वाचविणे हे प्राधान्य असले पाहिजे.
चोडणकर म्हणाले की, युवक कॉंग्रेसने लोकांना ऑक्सिजन देऊन मानवतेचे उदाहरण ठेवले आहे. “युवक कॉंग्रेसने इतर राजकीय पक्षांच्या अनेक समर्थकांनाही मदत केली आहे. आमचे ध्येय लोकांचे प्राण वाचविणे आहे. ” असे ते म्हणाले. कोविडची साखळी तोडण्यासाठी लोकांनीही युवक कॉंग्रेसला  मदत करण्याचे आवाहन चोडणकर यांनी केले आहे. रूग्णालयांमध्ये ऑक्सिजनची आवश्यक व्यवस्था करण्यास सरकार अपयशी ठरल्याने युवक कॉंग्रेसने गेल्या पंधरा दिवसांत अनेक रूग्णांना रूग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर देऊन त्यांना जीवनाचा श्वास दिला आहे.
“ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात भाजपा सरकारला अपयश आले आहे आणि याचा  पर्दाफाश डॉक्टरांनीच केला आहे. ऑक्सिजन नसल्याल्यामुळे डॉक्टर असहाय बनले आहेत. जेव्हा आम्ही रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हे सिलिंडर आम्ही कोठे खरेदी केले याची चौकशी करण्यासाठी भाजप सरकारने आम्हाला पोलिस स्टेशनमध्ये  बोलवून त्रास दिला. ” असे अ‍ॅड. वरद म्हार्दोळर म्हणाले. “कॉंग्रेस लोकांसाठी आणि कोविड रुग्णांसाठी काम करत असल्याचे या सरकारला ॲलर्जी असेल तर त्यांनी स्वतः लोकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि जर भाजपा कामगिरी करू शकत नसेल तर त्यांनी ते मान्य केले पाहिजे. त्यांना लोकांच्या जीवाशी खेळण्याचा कोणताही अधिकार नाही. ” असे म्हार्दोळकर म्हणाले.
अ‍ॅड. म्हार्दोळकर म्हणाले की ऑक्सिजन सिलिंडर्स सुरक्षित आणि पद्धतशीरपणे वाहतूक करता यावे या उद्देशाने हे वाहन सुरु केले गेले आहे. “लोक आमच्या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करु शकतात, आम्ही लवकरात लवकर त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करु. त्यांचे प्राण वाचविणे हे आमचे ध्येय आहे. ” असे ते म्हणाले.
याशिवाय युवा कॉंग्रेसने गरीब व गरजू रूग्णांना, तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही,  उपचारासाठी रूग्णालयात नेण्यासाठी वाहन सुरू केले आहे. “अनेक लोकांनी आम्हाला कॉल करुन सांगितले की एम्बुलन्स उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे आम्ही  वाहनांची व्यवस्था केली. परंतु नंतर आम्हाला वाटले की या कारणासाठी खास वाहन असायला पाहिजे. त्यासाठी आम्ही ही सेवा सुरु केली आहे. सध्या हे वाहन उत्तर गोव्यासाठी उपलब्ध होईल आणि नंतर आम्ही दक्षिण गोव्यात त्याचा विस्तार करू. ” असे म्हार्दोळकर म्हणाले. अशी अनेक कुटुंबे आहेत की ज्यांच्याकडे वाहने नसतात आणि म्हणूनच त्यांना रुग्णालयात पोहोचणे अवघड जाते. “आम्ही प्रत्येक उपयोगानंतर वाहन सॅनिटायझ करणार  व चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू.” असे त्यांनी यावेळी नमूद केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: