मुंबई 

​’शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे संवेदनशीलपणे करा’

​पालघर​ (अभयकुमार देशमुख)​ :
तौक्ते चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. डहाणूतील चिकू, आंबा, केळी, मिरची आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी उद्धवस्त झाला आहे. घरांची पडझड झाली आहे, या सर्व बाबींचे पंचनामे करताना अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवावी, अशा सूचना भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज डहाणू दौऱ्यात केल्या.

तौक्ते चक्रीवादळाने पालघर जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमार यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व मच्छीमारांना भेटण्यासाठी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार आणि आमदार मनिषा चौधरी दोन दिवस किनारपट्टीचा दौरा करीत आहेत. आज त्यांनी डहाणू येथे चिकू उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेऊन दौऱ्याला सुरुवात केली. सरावली येथे चिकू उत्पादक शेतकऱ्यांची बैठक यावेळी घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की,  चिकूचे फळ तयार होण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागतो. या वादळाने आता चिकूचे फळ तयार होत असताना हाताशी आलेले फळ तर वाया गेलेच शिवाय नवीन आलेला फुलोरा ही वाया गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या किसान ट्रेनमुळे चिकू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. नुकतेच 6 बोगी दिल्लीच्या मार्केटमधे गेल्या. त्यानंतर हंगाम सुरु होत असतानाच वादळाने बाग पुर्णपणे उद्धवस्त झाल्या. त्यासोबत याच पट्ट्यात केळी, आंबा, भात, मिरची सह कोळंबी उत्पादक शेतकऱ्याला ही मोठा फटका बसला आहे. याचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत.

ज्या ज्या वेळी अशा नैसर्गिक आपत्ती मध्ये शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना मदत दिली जाते त्यावेळी या भागातील शेतकऱ्यांना कधीच मदत मिळत नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात चिकू उत्पादक शेतकऱ्यांचा संपूर्ण शेतीचा पिक विमा उतरवला जात होता. मात्र आघाडी सरकारने या नियमात बदल केल्याने केवळ 4 एकरचा विमा उतरवला जातो. त्यातही 50 टक्केच रक्कम मिळते. त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला शासनाने तातडीने मदत करावी, तसेच पिक कर्ज उपलब्ध करुन द्यावे अशा मागण्या शेतकऱ्यांनी मांडल्या.

ashish_shelarयावेळी आमदार मनिषा चौधरी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, सर्व बाबींचे तातडीने पंचनामे करा. अशा संकटकाळी योग्य मागणी आणि वस्तुस्थिती सांगणारे पंचनामे होणे आवश्यक असतात. पण आजपर्यंतचा अनुभव असा आहे की, अधिकारी पंचनामे नीट करीत नाहीत आणि योग्य मागणीच होत नाही. त्यामुळे तातडीने पंचनामे करा अशा सुचना त्यांनी केल्या.

तर आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हणाले की, शेतकऱ्यांवरील संकट मोठे आहे. तसेच नुकसान भरपाई देणारा जीआर तोकडा आहे. त्यामुळे शासनाने अधिकचा विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी अधिकार्यांनी नुकसानीच्या दाहकतेचे वास्तव चित्र कागदोपत्री दिसेल अशा पद्धतीने पंचनामे करावे. आम्ही विधानसभेत, प्रसंगी केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांचे म्हणणे, व्यथा, मागण्या आक्रमकपणे मांडू, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. पक्ष म्हणून सुध्दा भाजप शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे आश्वस्त केले.

या बैठकीत कोरोनाचे नियम पाळून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन नाईक आणि स्थानिक भाजपा पदाधिकारी सुद्धा यावेळी उपस्थितीत होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: