google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

”स्मार्ट सिटी’ नव्हे तर राजधानीची झाली ‘डर्ट सिटी”

पणजी:

पणजीचे “स्मार्ट सिटी” मध्ये रूपांतर करण्यासाठी विविध कामांवर 1000 कोटींहून अधिक खर्च केल्यानंतर गोव्याच्या राजधानीचे प्रत्यक्षात “डर्ट सिटी” मध्ये रूपांतर झाल्याचे उघड झाले आहे. पणजी स्मार्ट सिटीच्या निकृष्ट कामांना महसूल मंत्री आंतानासीयो मोन्सेरात यांनी मान्यता देणे ही नगरविकास मंत्री विश्वजित राणे यांच्यासाठी “एक्झिट अलार्म” आहे, असा टोला काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.

पणजी स्मार्ट सिटीची सर्व कामे निकृष्ट असून, सल्लागाराला दिलेले 8 कोटी रुपये वाया गेल्याच्या बाबूश मोन्सेरात यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी बाबूशचे वक्तव्य म्हणजे काँग्रेसच्या “मिशन टोटल कमिशन” घोषणेला अनुमोदन असे म्हटले आहे.

महसूल मंत्री आतानासीयो मोंसेरात यांनी दिड वर्षामागे जाहिर केलेल्या ७० कोटींचा सार्वजनीक बांधकाम खात्यातील कनिष्ठ अभियंता भरती घोटाळ्याचा परिणाम म्हणून सदर पदे रद्द करणे भाजप सरकारला भाग पडले तसेच तत्कालीन सार्वजनीक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांच्यावर घरी बसण्याची पाळी आली. मला खात्री आहे की त्यांचा हा ताजा खुलासा नगरविकास मंत्री विश्वजित राणे यांना आपले बिस्तर गुंडाळायला भाग पाडेल, असे अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.

इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड (IPSCDL) द्वारे चालविलेली स्मार्ट सिटीची कामे अनइमेजीनेबल म्हणजे अकल्पनीय ठरली आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये गदारोळ, काँग्रेस पक्ष आणि पणजीच्या रहिवाशांनी केलेल्या निदर्शनानंतरही नगरविकास मंत्री विश्वजित राणे यांनी पूर्ण मौन बाळगले आहे. ते भाजपच्या “मिशन टोटल कमिशन” चा भाग आहेत आणि त्यामुळेच कामाची पाहणी करून कंत्राटदारांवर कारवाई करण्याची हिंमत त्यांच्यात नाही, असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.

महसूल मंत्री आणि पणजीचे आमदार आतानासीयो मोन्सेरात आता विक्टीम कार्ड खेळू शकत नाहीत. ते तसेच त्यांचा मुलगा पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात हे दोघेही पणजीतील सर्व गोंधळाला जबाबदार आहेत. येत्या पावसाळ्यात पणजी बुडणार हे सर्वानाच कळून चुकल्याने आता उंदीर बाहेर उड्या मारत आहेत, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

प्रशासक म्हणून आपण अयशस्वी झालो आहोत हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या लक्षात आले आहे आणि त्यांनी आता ज्योतिषशास्त्राकडे वळण्याचा प्रयत्न केला आहे. पणजी बुडणार नाही, असे सांगणारे त्यांचे भाकीत केवळ त्यांनाच नाही तर संपूर्ण भाजप सरकारला बुडवेल, असे भाकित अमरनाथ पणजीकर यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!