गोवा 

‘…म्हणून लागू केला द. गोव्यात रा.सु.का.’

 काँग्रेस प्रभारी दिनेश राव यांनी केला मुख्यमंत्र्यांवर आरोप

मडगाव :
गेल्या नऊ वर्षात राज्यात सुरु असलेल्या अनागोंदी कारभाराविरोधात लोक आता खुलेपणाने बोलू लागले आहेत. या सरकारला आता गोव्यातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे या जनसामान्यांचा आवाज दाबण्याच्या विविध क्लृप्त्या आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अवलंबत आहेत. दक्षिण गोव्यात लागू केलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा हा याचाच एक भाग असून, सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ​लोक​सुनावणीमध्ये लोकसहभागास अटकाव करण्यासाठीच ​हा कायदा ​दक्षिण गोव्यात ​लागू केला आहे. आणि आता लवकरच ​उत्तर गोव्यामध्ये सुद्धा हा कायदा लागू करण्यात येईल असा दावा राष्ट्रीय काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केला. 

​​नुवे ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्यावतीने ​ दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात आयोजित किराणा पाकीट वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी परिसरातील ५०० हुन अधिक गोरगरिबांना आणि गरजूंना आवश्यक त्या किराणा पाकिटांचे वितरण करण्यात आले.
​यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे निरीक्षक प्रकाश राठोड, दक्षिण गोवा निरीक्षक सुनील हनुमन्नवर, उत्तर गोवा निरीक्षक मन्सूर खान, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, माजी मंत्री अलेक्सो सिक्वेरा, माजी आमदार अग्निलो फर्नांडिस, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष एम. के. शेख, सरचिटणीस सुभाष फळदेसाई, दक्षिण गोवा अध्यक्ष जोय डायस, नुवे ब्लॉक अध्यक्ष मॅनुअल डी’कोस्टा आदी उपस्थित होते.​
 ​आमचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या वाढदिनी कोणताही समारंभ साजरा ना करता या कोविड काळात देशातील जनतेची शक्य त्या सगळ्या मार्गाने मदत करा, असे आवाहन पक्ष कार्यकर्त्यांना केले ​होते. आणि मला अभिमान वाटतो की दक्षिण गोवा काँग्रेस कमिटीने दिवसभरात विविध सामाजिक उपक्रम घेत नेहमीच जनतेची सेवा करण्याला प्राध्यान्य दिले, अशा शब्दात दिनेश राव यांनी संघटनेचे कौतुक केले.
२०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष राज्यात सत्ता स्थापन करेल याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही. त्यामुळे पक्ष सत्तेत आल्यानंतर राज्यातील मोटरसायकल पायलट, रिक्षाचालक, मॅकेनिक, मच्छिमार, खाजेकर, माळी, बेकरीत काम करणारे, पाडेली हे आणि असे विविध छोटे-मोठे काम करणारे, हातावर पोट असणारे मजूर यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन यावेळी दिगंबर कामत यांनी केले.
दिनेश राव आणि इतर पदाधिकारांच्या या चार दिवसाच्या गोवा भेटीमुळे पक्षामध्ये नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. या चार दिवसात विविध मतदारसंघांना दिलेल्या भेटीमधून एक बाब प्रकर्षाने समोर आली ती म्हणजे २०२२ मध्ये काँग्रेस पक्षच सत्ता स्थापन करेल हा विश्वास लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
काँग्रेससोबत मी एकनिष्ठ असून दक्षिण गोव्यातील वीसही मतदारसंघामध्ये काँग्रेसचेच उमेदवार विजेते
होतील यासाठी आम्ही प्रचंड मेहनत करत आहोत. दक्षिण गोवा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून येणाऱ्या निवडणुकीत सगळे मतदारसंघ जिकून यावर जनता देखील शिक्कामोर्तब करेल, असा विश्वास जॉय डायस यांनी व्यक्त केला..
जिल्हा खजिनदार पीटर गोम्स यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: