सातारा 

​’​गजवडी​,​ ठोसेघर येथे कोरोना केअर सेंटर सुरु करा​’​

सातारा​ (महेश पवार) :​
जावली तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. सोमर्डी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय मनुष्य बळ अपुरे पडत असल्याने रुग्णांची आणि लसीकरणासाठी येणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या रुग्णालयाला तत्काळ वाढीव वैद्यकीय मनुष्यबळ द्या. तसेच परळी भागातील रुग्णांच्या सोयीसाठी सोनवडी- गजवडी येथे तर ठोसेघर भागातील रुग्णांसाठी ठोसेघर येथे कोरोना केअर सेंटर सुरु करा, अशी आग्रही मागणी ​आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

यासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठले यांची भेट घेतली. सोमर्डी ग्रामीण रुग्णालयात काही पदे रिक्त आहेत तर जे वैद्यकीय मनुष्यबळ आहे ते अपुरे पडत आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची तपासणी आणि उपचार तसेच कोरोनावरील लसीकरण यावर विपरीत परिणाम होत असून लोकांची फारमोठी गैरसोय होत आहे. रुग्णांची आणि ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी  सोमर्डी ग्रामीण रुग्णालयाला वाढीव दोन मेडिकल ऑफिसर, दोन भिषक तज्ञ वैद्यकीय अधिकारी, तीन नर्स, एक एक्सरे टेक्निशियन, एक ईसीजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन दोन, फार्मासिस्ट एक, वॉर्ड बॉय दोन आणि सफाई कामगार दोन असा वाढीव आणि आवश्यक स्टाफ तातडीने पुरवण्यात यावा अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. याबाबतचे निवेदनही त्यांनी गौडा आणि डॉ. आठले याना दिले.

दरम्यान, परळी आणि ठोसेघर भागातही रुग्णांची संख्या वाढत आहे. हे दोन्ही भाग डोंगराळ आहेत त्यामुळे रुग्णांच्या सोयीसाठी ठोसेघर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सोनवडी- गजवडी येथील छत्रपती अभयसिंहराजे भोसले माध्यमिक विद्यालय आणि जुनियर कॉलेज येथे अद्यावत कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात यावे, अशी मागणीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. सोमर्डी रुग्णालयासाठी वाढीव वैद्यकीय मनुष्यबळ पुरवणे आणि ठोसेघर, गजवडी येथे कोरोना केअर सेंटर उभारणे याला गौडा आणि डॉ. आठले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित निर्णय घेऊ, असे सांगितले.

​​कायमस्वरूपी रुग्णवाहिका द्या
कोरोना महामारीचे संकट पाहता रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सातारा तालुक्यातील डोंगराळ भागातील परळी आणि ठोसेघर आरोग्य केंद्रासाठी तसेच जावळी तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील केळघर, बामणोली आणि कुसुंबी येथे कायमस्वरूपी प्रत्येकी एक रुग्णवाहिका विनाविलंब उपलब्ध करून द्या, अशी सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली असून याबाबतही लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन गौडा आणि डॉ. आठले यांनी दिले.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: