गोवा 

‘मालभाट येथे कोविड चाचणी केंद्र सुरू करा’

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची मागणी

मडगाव  :
गोव्यातील भाजप सरकारने कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन आताच तयारी करणे गरजेचे आहे. मालभाट येथे सरकारने कोविड चाचणी केंद्र सुरू करावे असा प्रस्ताव मी सरकारकडे ठेवला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सदर चाचणी केंद्र सुरू करण्यास त्वरित मान्यता द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

सदर चाचणी केंद्रासाठी मालभाट येथे आज दिगंबर कामत यांनी उप-जिल्हाधिकारी ज्योती कुमारी, संयुक्त मामलेदार रघुराज फळदेसाई व तलाठी कल्पेश देवुलकर यांच्या सोबत जागेची पाहणी केली.

सरकारने येथे लवकर चाचणी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. लोकांना सुरक्षित राहण्यास त्यामुळे मदत होणार आहे. सरकारला माझ्या ह्या प्रस्तावात राजकारण दिसणार नाही अशी मी आशा बाळगतो असे दिगंबर कामत म्हणाले.

काल आदर्श हायस्कुलमध्ये कोविड लसीकरणाचे पर्यटन मंत्री व पेडणेचे आमदार मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी केलेल्या उद्घाटनावर प्रतिक्रीया देताना दिगंबर कामत यांनी ” सदर चार दिवसीय कोविड लसीकरणाचा प्रस्ताव मी २८ एप्रिल व १ मे २०२१ रोजी लेखी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवला होता. माझ्या लेखी पत्रात मी कोविड लसीकरण केंद्राची नावे सादर केली होती. त्यानंतर मागील कित्येक दिवस पाठपुरावा केल्यानंतरच सरकारने लसीकरण करण्याचे जाहिर केले. प्रसिद्धीसाठी हपापलेल्या भाजपला माझ्या प्रयत्नांमुळे फोटो काढुन सवंग प्रसिद्धी घेण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे असे दिगंबर कामत म्हणाले.

आमचे कार्यकर्ते लोकांना मदत करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. एनएसयुआयचे पथक मडगावात असुन, ज्येष्ठ नागरीकांना कोविड लसीकरण केंद्रावर ने-आण करण्यासाठी ते मदत करीत आहेत. आम्हाला समाजसेवा करताना फोटो काढण्याची गरज नसुन, आमच्या सेवेचा लाभ झालेल्यांच्या ह्रदयातुन मिळणारे आशिर्वाद आमच्यासाठी लाख मोलाचे आहेत.

मी स्वत: चोविस तास लोकांसाठी उपलब्ध असुन, रात्री-अपरात्री गरजू कोविड रुग्णांना ऑक्सिजन, खाटा, औषधे मिळवुन देण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. तौक्ते चक्रीवादळानंतर नुकसान झालेल्या मडगावातील प्रत्येक घराला व इतर जागांना मी भेट देवुन पाहणी केली आहे व त्यांना मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे. परंतु, अश्या सगळ्याच कामाचे फोटो काढुन ते समाजमाध्यमांवर टाकणे बरोबर नव्हे असे दिगंबर कामत म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: