गोवा 

‘स्वयंपूर्ण मित्र’ देणार पंचायतीना भेट

पणजीः
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १ जुलैपासून सरकारच्या विविध योजनांर्गत लोकांना मिळणाऱ्या लाभांची माहिती देण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा मिशन’ अंतर्गत नियुक्त केलेले स्वयंपूर्ण मित्र सर्व ग्रामपंचायतींना भेट देतील, असं सांगितलं.

मुख्यमंत्री म्हणाले की, आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा अभियानांतर्गत गोव्याला मानवी प्रयत्नांच्या सर्व क्षेत्रात स्वावलंबी बनविण्याचं निर्णायक ध्येय साध्य करण्यासाठी सरकारने १९१ सरकारी अधिकारी स्वयंपूर्ण मित्र म्हणून नियुक्त केले आहेत, जे प्रत्येक पंचायत आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अस्नोडा येथे ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा मिशन’ अंतर्गत अस्नोडा ग्रामपंचायतीने रोटरी क्लब ऑफ म्हापसा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गरजू महिलांना २१ शिवणयंत्रांचे वाटप केल्यानंतर मुख्यमंत्री मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते.

अस्नोडा ग्रामपंचायतीसाठी स्वयंपूर्ण मित्र म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ईशा सावंत यांचं कौतुक केलं. ते म्हणाले की, “आपदा सखी” यासारख्या कार्यक्रमांमुळे महिलांना चक्रीवादळ, भूस्खलन आणि घरात होणार्‍या आपत्तीसारख्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यास मदत होईल. अस्नोडा ग्रामपंचायतीने महिलांसाठीचे हे प्रशिक्षण सत्र पूर्ण केलं आहे. निर्णायक ध्येय साध्य करणं हा या स्वयंपूर्ण मित्र नेमण्याच्या उद्देश आहे.

या कार्यक्रमाला आमदार नीलकंठ हळर्णकर, सपना मापारी, स्वयंपूर्ण मित्र ईशा सावंत, जिल्हा पंचायतीच्या उपाध्यक्षा दीक्षा खांडोळकर, रोटरी क्लब म्हापसाचे अध्यक्ष अभिजीत वाळके, बार्देशचे बीडीओ मनीष केदार उपस्थित होते. यावेळी अस्नोडा ग्रामपंचायतीने रोटरी क्लब ऑफ म्हापसाच्या सहकार्याने अयोजित केलेल्या ५ ते ६ दिवसांच्या आत सर्वेक्षण पूर्ण करण्यास दिलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्र्यांहस्ते बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार नीलकंठ हळर्णकरांनी आपल्या भाषणात अस्नोडा पंचायतीने आतापर्यंत विविध विकासकामं केली असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की स्वयंपूर्ण मिशन अंतर्गत गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. गाव स्वावलंबी बनविण्यासाठी लोकांनी, पंचायत सदस्यांनी स्वयंपूर्ण मित्रांना सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केले. ईशा सावंत यांनी उपस्थितांचं स्वागत केलं, तर अभिजीत वाळके यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: