गोवा 

‘समुद्रकिनार्‍यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा’

काणकोण :
तौक्ते चक्रीवादळानंतर गोव्यात प्रचंड नुकसान झाले. राज्य सरकारने अद्याप नुकसानग्रस्त नागरिकांना भरपाई सुद्धा दिली. समुद्रकिनाऱ्यावरील व्यवसायिकांची तारांबळ उडाली. हे काही प्रमाणात टाळता आले असते. मुळात समुद्रकिनाऱ्यावर असे प्रकार घडण्या करता कारणीभूत असलेल्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया काणकोण भागातून व्यक्त होत आहेत.
या चक्रीवादळामुळे काणकोण भागातील काही समुद्रकिनाऱ्यावर हा:हा:कार उडाला होता.आगोंद समुद्र किनाऱ्याची धूप झाली, किनाऱ्यावरील लहान होड्यांची व मच्छिमारजाळ्याची नुकसानी झाली तसेच माडाची झाडे कोसळली, किनाऱ्यावरील पर्यटक संबंधी आस्थापनांना मोठे नुकसान सोसावे लागले.
चक्रीवादळानंतर सरकारच्या आदेशानुसार सरकारी यंत्रणेतर्फे करण्यात आलेल्या निरीक्षणा वेळी सुमारे रुपये १ कोटी नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे. यामध्ये रु.२० लाख कृषी खाते तर सुमारे रु.१० लाख घरासंबंधीत नुकसान झाले आहे. याशिवाय वीज खाते, जलस्रोत खाते व अन्य यांचेही नुकसान झालेले आहे.
सीआरझेड अर्थात किनारी नियमन विभागातर्फे समुद्र किनाऱ्याचे मोजमाप करून साधारण ३० वर्षापूर्वी भरती रेषेपासून ५० मीटर पर्यंत कोणत्याही बांधकामास मज्जाव करण्याकरता दगड खूण घालण्यात आली होती. मात्र काही वर्षांनंतर समुद्रकिनारे सोन्याची अंडी देणारी मुर्गी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काही पर्यटन व्यवसायिकांनी समुद्रकिनाऱ्यावर अतिक्रमण करण्याची काम केले. अशी प्रतिक्रिया पेशाने वकील असलेले मयूर काणकोणकर यांनी दिली.
सुरुवातीला जागृत नागरिकांनी याला विरोध केला. सी आर झेड ला तक्रारी सादर केल्या. मात्र त्या तक्रारीची दखल न घेता, बेकायदेशीर बांधकामाचे निरीक्षण न करता, या कृत्याला पाठीशी घालण्याचे काम केले. बेकायदेशीर कृत्यांना ना हरकत दाखला देण्या इतपर्यंत काहींची मजल गेली. देखा-देखी अन्य व्यावसायिकांनीही समुद्रकिनाऱ्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकामे उभारली. असे काणकोणकर यांनी पुढे स्पष्ट केले.
आज रोजी संपूर्ण आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकावर असलेला आगोंद समुद्रकिना-याला जे आजचे स्वरूप प्राप्त झाले आहे ते केवळ समुद्रकिनार्‍यावर अतिक्रमण करणाऱ्यामुळे व अशा लोकांना पाठीशी घालणाऱ्या सीआरझेडच्या अधिकार्‍यामुळे शक्य झाले. या संपूर्ण प्रकाराची योग्य दखल घेऊन संबंधित अधिकारी व अतिक्रमण करणारे, यांची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी आपण करत आहे. मात्र या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार नाही हेही सत्य असल्याचे काणकोणकर यांनी सांगितले.
पावसाळ्यात समुद्र किनाऱ्याची धूप होऊन होऊन दरवर्षी अनेक वेळा आगोंद समुद्रकिनाऱ्यालगतची माडाची झाडे कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. गेल्यावर्षी स्थानिक आमदार व काणकोणचे मामलेदार  यांनी किनार्‍यावर संरक्षक भिंत उभारण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आजपर्यंत या ठिकाणी काहीच काम झाले नाही. वाल या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावरची रेती काढण्याचे प्रकार मध्यरात्री २ ते पहाटे ५ पर्यंत कामगारांवरवी करण्यात येत आहे. हा प्रकार गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. ही रेती बांधकाम करण्याकरता वापरण्यात येत आहे. मात्र संबंधित यंत्रणा या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहे. या प्रकाराला वेळीच आळा आणला असता तर एवढे नुकसान झाले नसते.अशी प्रतिक्रिया पंचायत सदस्य आबेल बोर्जिस यांनी दिली.
काणकोणातील समुद्रकिनाऱ्याचे निरीक्षण करून काणकोणचे मामलेदार सरकारला अहवाल सादर करणार आहेत. समुद्रकिनारी संरक्षक भिंत बांधण्याचा सरकारने विचार करायला हवा. असे फेर्नांडो फर्नांडिस यांनी म्हटले आहे.
तौक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीचे कृषी खाते व जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी निरीक्षण केले आहे. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्यात येईल. असे मामलेदार विमोद दलाल यांनी म्हटले आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: