गोवा 

‘मातृभूमी सेवा प्रतिष्ठान’ देणार कोविड रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स

पणजी :
‘मातृभूमी सेवा प्रतिष्ठान’ हि सामाजिक संस्था गरजू कोविड रुग्णांना कॉन्सेन्ट्रेटर्स उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवत असून काल प्रतिष्ठानच्या कॉन्सन्ट्रेटर्स बॅन्केत आणखी पाच कॉन्सेन्ट्रेटर्सची भर पडली आहे.  केंद्रीय सुरक्षा मंत्रालयाच्या अधिपत्त्याखाली काम करणाऱ्या गोवा शिपयार्डने मातृभूमी सेवा प्रतिष्ठानला पाच कॉन्सन्ट्रेटर्स दान केले आहेत.

उपलब्ध असलेल्या दोन कॉन्सन्ट्रेटर्सवर मातृभूमी सेवा प्रतिष्ठान कोविड बाधितांची गरज भागवत होती. प्रतिष्ठानच्या खात्यात पाच अधिक कॉन्सन्ट्रेटर्सची भर पडली असल्यामुळे आता अधिक प्रमाणात रुग्णांची सेवा करता येईल, याबद्दल प्रतिष्ठानने समाधान व्यक्त केले आहे.

मातृभूमी सेवा प्रतिष्ठानने कोविद महामारी विरुद्ध लढा पुकारलेल्या गोवा शीपयार्डचे कमांड़र भारत भूषण नागपाल यांचे आभार मानले आहे. गोवा शीपयार्डच्या सीएसआर विभागाचे उप व्यवस्थापक अमितकुमार यांनी केंद्रीय रक्षा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे सदर कॉन्सन्ट्रेटर्स सुपूर्द केले.

कोविड १९ बाधितांना मदत करण्यासाठी मातृभूमी सेवा प्रतिष्ठान पुढे सरसावली असून गरजू रुग्णांना लाभ व्हावा यासाठी गोवा शीपयार्डकडे कॉन्सन्ट्रेटर्सची मागणी केली होती. मातृभूमी सेवा प्रतिष्ठानला आता अधिक प्रमाणांत रुग्णांना सहाय्य करता येणार आहे. रोटेशन पद्धतीने कॉन्सन्ट्रेटर्स रुग्णांना  उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गरज भागल्यावर रुग्णांना कॉन्सन्ट्रेटर परत प्रतिष्ठानकडे सुपूर्द करायचा आहे.

गोव्यात कॉन्सन्ट्रेटर्सची सध्या मोठ्या प्रमाणात टंचाई भासत आहे. गोवा सरकार तसेच केंद्र सरकार आपल्या परीने ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे.  अनेक समाजसेवी संस्था त्रस्त रुग्णांच्या  मदतीसाठी पुढे येत आहेत. इस्पितळात भरती झालेल्या व गृह अलगीकरण पत्करलेल्या रुग्णांना कॉन्सन्ट्रेटर्स बरोबरच मोफत जेवण समाजसेवी संस्थांकडून पुरविले जात आहे.

मातृभूमी सेवा प्रतिष्ठानने` वापरा व परत करा` या तत्वावर रुग्णांना मोफत कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. एखाद्या रुग्णाला कॉन्सन्ट्रेटरच्या आधाराची खरोखरच आवश्यकता आहे की नाही हे मातृसेवा प्रतिष्टानतर्फे नेमण्यात आलेले डॉ. हेमंत गुप्ता हे ठरविणार असून त्यांच्या शिफारसीनुसार रुग्णाला कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात येईल. डॉ. गुप्ता हे सीसीआरएएस, गोवा विभागाचे अधिकृत अधिकारी आहेत.

गरजूंनी मातृसेवा प्रतिष्ठानचे सचिव सुरज नाईक यांच्याशी ९८५०५२४००२/०८३२२४३८५०१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: