गोवा 

‘राज्याचे आपत्ती व्यवस्थापनच शरपंजरी’

काँग्रेसच्या अमरनाथ पणजीकर यांची  बोचरी टीका

पणजी :

कोविड पाठोपाठ आलेल्या तौक्ते वादळाने नागरिकांवर संकट ओढवले असून याकाळात भाजप सरकारची आपत्कालीन व्यवस्थापन (Disaster managment) यंत्रणाच शरपंजरी पडल्याची बोचरी टीका कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत,  योग्य सुविधांच्या अभावी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांसाठी मदत करणारे वीज व अग्नीशमन दलाचे कर्मचारी तसेच इतर समाजसेवक यांचे आम्ही जाहिर अभिनंदन करतो. लोकांसाठी आपले कर्तव्य बजाबणाऱ्यांना सलाम असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

वीज मंत्री निलेश काब्राल यांना मंत्रीपदी राहण्याचा नैतीक अधिकार नसुन, त्यांनी आपली खुर्ची ताबडतोब सोडावी. आपले कर्तव्य बजावण्यास ते पुर्णपणे अपयशी ठरले आहेत. सार्वजनीक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांचा पत्ताच नाही. लोक पाण्याविना हाल काढत आहेत. कोविड महामारीत सरकारने लोकांना यातना दिल्या आहेत. चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. पिकांची नासाडी झाली असुन, शेतकरी हवालदिल आहे. परंतु, कृषीमंत्री बाबू कवळेकर गायब असुन, कदाचीत आपल्या मोबाईलवरुन व्हिडीयो पाठविण्यात ते व्यस्त असतील असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.

आज आपत्ती व्यवस्थापन (Disaster managment) यंत्रणा अस्तित्वातच नाही. उत्तर गोव्याचा बहुतांश भाग मागील तिन दिवस अंधारात आहे. वीज खात्याचे कर्मचारी वीज पुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांच्याकडे आवश्यक उपकरणेच नसल्याने त्यांच्यावर मर्यादा येत आहेत. वीज खात्याचा भोंगळ कारभार आता उघड झाला आहे. आवश्यक ते मनुष्यबळ, वाहने, शिडी व  क्रेन तसेच इतर साधन सामग्री नसल्याने वीज कर्मचाऱ्यांच्या कामावर मर्यादा येत आहेत. कोसळलेल्या खांबाच्या जागी नविन उभारण्यास खांबच नाहीत अशी परिस्थिती आहे.

बोरी येथे वीज खांब घेवुन जाणाऱ्या एका जुन्या ट्रकला अपघात होवुन प्राणहानी झाली होती. परंतु, वीजमंत्री निलेश काब्राल यांनी धडा घेतलेला नाही. वीज कर्मचाऱ्यांना अजुनही आवश्यक सुरक्षा कवच देण्यात आलेले नाहीत हे धक्कादायक आहे. काल पर्वरी येथे वीजेचा शॉक लागुन एक कर्मचारी खाली कोसळला परंतु त्याला इस्पितळात नेण्यासाठी तेथे सरकारी वाहन नव्हते. स्थानिकांनी त्याला इस्पितळात नेल्यानेच त्याचे प्राण वाचले असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

बार्देस तालुक्यात वादळाची सर्वाधिक झळ बसली असुन, उत्तर गोव्यातील प्रमुख शहर असलेल्या म्हापशात तिन दिवस वीज गायब आहे. राजधानी पणजी व सभोवतालच्या परिसरातही वीज नसल्याने लोकांचे हाल झाले. सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हळदोणा, डिचोली, चोडण व इतर भाग अजुनही अंधारात आहेत. पार्टी व्हिथ अ डिफरंस म्हणणारा भाजप मात्र आपले मंत्री, आमदार व नगरसेवकांमधील डिफरंसिस सोडवण्यात व्यस्त आहे असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला.

आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील असंवेदनशील भाजप सरकारकडुन लोकांना कसलिच अपेक्षा नसुन, कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लोकांना मदत करीत आहेत. आमच्या पक्षाने मदत कक्ष उघडला असुन, लोकांना मदतकार्य सुरू केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: