मुंबई 

‘…तर मनपाविरोधात सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करणार’

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
गेल्या तीन महिन्यापासून वृक्ष छाटणीकरिता कंत्राटदाराच्या नियुक्तीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समिती समोर १८ मार्च २०२१ पासून आजतागायत प्रलंबित असून याला जबाबदार कोण? असा सवाल करत येत्या आठवडाभरात वृक्ष प्राधिकरणामध्ये वृक्ष छाटणीच्या प्रस्तावास मंजुरी देऊन प्रत्यक्ष वृक्ष छाटणीस प्रारंभ केला नाही तर मुंबई (mumbai) महापालिकेवर सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावेल असा गंभीर इशारा भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत दिला.
तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबई शहरात २ हजार ३६४ वृक्ष उन्मळून पडल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. वादळानंतर ४८ तास उलटूनही रस्त्यावर पडलेल्या वृक्षांच्या फांद्या हटविण्यात आलेल्या नाहीत. याबाबत उद्यान विभागाकडे विचारणा केली असता हे काम करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
prabhakar shinde
प्रभाकर शिंदे

तोक्ते चक्रीवादळाला सामोरे जाण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज असल्याचा केवळ देखावा करण्यात आला. तोक्ते नैसर्गिक आपत्तीत पालिका प्रशासनाच्या मनुष्यबळाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. वादळानंतर ४८ तासांचा कालावधी लोटूनही रस्त्यावर पडलेल्या मोठ्या वृक्षांच्या फांद्या बाजूला करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वाहतुकीला अडचण होत आहे. नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाताना उद्यान विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ, मोठी झाडे कापण्यासाठी साधनसामुग्री, विद्युत करवती उपलब्धच नाहीत. रस्त्यावरिल पालापाचोळा उचलण्यासाठी यंत्रणाच तोकडी पडल्याचे चित्र आहे.

वृक्ष प्राधिकरणाने वेळीच वृक्ष छाटणीसाठी कंत्राटदार नियुक्त केला असता तर मार्च-एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष छाटणी झाली असती. त्यामुळे भार हलका झाल्याने कितीतरी झाडे कोसळलीच नसती. वृक्ष प्राधिकरण समितीच्या या अक्षम्य विलंबामुळे मुंबई शहर हजारो मोठ्या आणि प्राचीन वृक्षांना मुकले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात वित्तहानी गाड्यांची नासधूस झाली आहे. पालिकेच्या या बेजबाबदार वर्तनाचा तीव्र निषेध भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी स्थायी समितीत केला.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: