महाराष्ट्र

महाराष्ट्रातील तीन जिल्हे अद्यापही अंधारातच

​मुंबई :

तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यातील सात जिल्ह्यांतील वीज यंत्रणेला तडाखा बसल्याने तब्बल 35 लाख 87 हजार २७६ ग्राहकांची वीज खंडित झाली होती. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अविश्रांत कामांद्वारे महावितरणने वादळावर मात केली असून सुमारे ९९ टक्के भागातील वीज पुरवठा पूर्ववत केला आहे. तर अद्यापही पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील 1 हजार 473 ग्राहक अद्यापही अंधारात आहेत.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीला धडक देत प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड तसेच पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांतील वीजयंत्रणेला मोठा तडाखा दिला होता. यामध्ये 201 उपकेंद्र, 1 हजार 342 उच्चदाब वीजवाहिन्या व 36 हजार 30 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच हानी देखील झाली होती. त्यामुळे या सातही जिल्ह्यातील 5 हजार 575 गावांतील 35 लाख 87 हजार 261 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या 13 हजार 786 कर्मचाऱ्यांनी अविश्रांत काम करत वीजपुरवठा पूर्ववत केला.

त्याचप्रमाणे 306 कोरोना रुग्णालये, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्र, 14 हजार ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांचा वीजपुरवठा तातडीने सुरु करण्यात आला. कोकणासह पुणे व कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगरदऱ्या, घनदाट जंगलातील धुके, संततधार पाऊस, चिखल व निसरड्या वाटा अशा प्रतिकूल परिस्थितीत जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा उभारण्याचे काम  करण्यात आले. चक्रीवादळानंतर तीन ते चार दिवसांमध्ये 90 टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात वीजयंत्रणेचे मोठे नुकसान झाल्यामुळे तसेच खडतर परिस्थितीमुळे विविध अडचणी आल्या. या तीन जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील उर्वरित 1 हजार 473 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरु असल्याचे महावितरणच्या प्रवक्त्याने सांगितले.​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: