मुंबई क्रीडा-अर्थमत

‘…तर शासनाच्यावतीने करण्यात येईल योग्य सन्मान’

मुंबई (अभयकुमार देशमुख) :

आपण टोकियो पॅराऑलिम्पिक २०२१ मध्ये चांगले यश मिळवल्यास शासनातर्फे तुमचा योग्य सन्मान केला जाईल, असे आश्वासन देतानाच पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सुयश जाधव या दिव्यांग जलतरणपटूला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्हिडीओ कॉलव्दारे शुभेच्छा दिल्या आहेत.

सोलापूरातील करमाळा तालुक्यातून येणाऱ्या दिव्यांग जलतरणपटू सुयश जाधव यांच्याशी आज व्हिडीओ कॉलद्वारे जयंत पाटील यांनी संवाद साधला.

सुयश यांचे नाव यंदाच्या टोकियो पॅराऑलिम्पिक २०२१ स्पर्धेसाठी भारताच्यावतीने निश्चित झाल्याचे वर्तमानपत्रातून समजल्यानंतर जयंत पाटील यांनी अपंगत्वावर मात करत महाराष्ट्राचं नाव मोठं करणाऱ्या सुयशला शुभेच्छा द्याव्यात असं वाटलं आणि त्यांनी तात्काळ सुयशशी संपर्क साधला.

सुयश यांनी २०१६ साली झालेल्या रियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेतही भाग घेतला होता. २०१८ साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा एकलव्य पुरस्कार देण्यात आला तर २०२० साली त्यांना भारत सरकारचा अर्जून पुरस्कार देखील देण्यात आला. जागतिक पातळीवर सुयश यांनी आतापर्यंत १२३ मेडल्स मिळवले आहेत. शारीरिक आव्हानांवर मात करत त्यांनी मिळवलेले हे यश खूपच कौतुकास्पद असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

जागतिक पातळीवर विविध स्पर्धेत भाग घेऊन यश मिळवणाऱ्या दिव्यांग खेळाडूंचा मागील सरकारने यथोचित सन्मान केला नाही अशी खंत सुयश जाधव यांनी जयंत पाटील यांना यावेळी बोलून दाखवली. मात्र जयंत पाटील यांनी आमचे सरकार तुमच्या गौरवासाठी कायम पुढे असेल असा शब्द सुयशला दिला.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: