गोवा 

”तौक्ते’ची भरपाई व्हावी वेळेत आणि पारदर्शीपणे’

पणजी :
चक्रीवादळ तौक्तेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई गोवा सरकारकडून ठराविक वेळेच्या आत आणि पारदर्शक पद्धतीने होणे गरजेचे आहे, अशी आम आदमी पक्षाची मागणी आहे.  मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे गोव्यातील जनतेचे पहिले कोविडमुळे मग लॉकडाऊन आणि नंतर तौक्ते चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व दुःख समजून घेण्यात अपयशी ठरले आहेत, असे प्रतिपादन राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी केले. तसेच त्यांनी विनंती केली की, मुख्यमंत्री सावंत यांनी गोयंकरांना नुकसानभरपाई लवकरात लवकर द्यावी.

“ ६० व्या ‘लिब्रेशन डे’च्या दोन तासाच्या का​​र्यक्रमासाठी मात्र तीन करोड रुपये लगेच खर्च करण्यात आले. तसेच कला अकादमीच्या नूतनीकरणासाठी कोणतीही विहित प्रक्रिया न पाळता 50 कोटी रुपये त्वरित मंजूर केले.  परंतु ज्यांनी आपल्या प्रियजनांना कोविडमुळे गमावले किंवा ज्यांनी लॉकडाऊनमुळे उत्पन्न गमावले अशा लोकांना किंवा ज्यांचे चक्रीवादळामुळे घरं- पिके यांचे प्रचंड नुकसान झाले, अशा सर्वांना एक रुपया देखील नुकसानभरपाई देण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहे. ”  असे म्हांबरे म्हणाले.

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत केवळ घोषणा केल्या असल्याचे सांगत म्हांबरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वेगवेगळ्या विसंगत विधानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.​ ​ “सुरुवातीला मुख्यमंत्री म्हणाले की, २२ कोटींचे नुकसान झाले. नंतर वाढवून 40 कोटीचे नुकसान सांगितले.  त्यानंतर दुसर्‍याच दिवशी अचानक हा आकडा 146 कोटींवर पोहोचला. अशा प्रकारच्या वादळांना आणि पूर घटनांना गोव्याने  काय पहिल्यांदाच बघितले, असे नाही.  झालेल्या नुकसानीचे अचूक व त्वरित मूल्यांकन करणे  हा देखील आपत्ती व्यवस्थापनाचा एक भाग आहे ; ज्यात सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहेत.  आता ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केवळ निवडणुका मोर्चासाठीच नव्हे तर लोकांच्या हितासाठीही करण्याची वेळ आली आहे, ” असे म्हांबरे म्हणाले.

म्हांबरे यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले की, सरकारने केवळ नुकत्याच झालेल्या नुकसानीची भरपाई न देता त्याचसोबत  बाधित घर मालक, मच्छीमार आणि शेतकरी यांना त्यांच्या पायावर पुन्हा उभे राहीपर्यंत त्यांच्या भविष्यातील दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आर्थिक भत्ता दिला पाहिजे.

“वेळीच केलेल्या मदतीचे महत्व आहे. मान्सूनच्या पावसामुळे उद्या परिस्थिती आणखी खराब होईल.  गोंधळलेल्या परिस्थितीमुळे लोकांच्या दुःखात आणखी भर पडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजकीय कार्यक्रम घेण्यापेक्षा आपल्या आश्वासनांची तातडीने पूर्तता केली पाहिजे ”अशी सूचना म्हांबरे यांनी केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: