देश-विदेश

पाकिस्तानात दोन रेल्वे गाड्यांची धडक, ३० प्रवासी ठार

इस्लामाबाद :
पाकिस्तानमध्ये दोन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात ३० प्रवासी मरण पावले असून, शेकडो जखमी झाले असल्याचं वृत्त आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, एका एक्स्प्रेस गाडीच्या धडकेमुळे दुसरी एक्स्प्रेस रुळावरून खाली घसरली. दक्षिण पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात ही सोमवारी पहाटे ही घटना घडली आहे.

असोसिएटेड प्रेसनं या रेल्वे अपघाताचं वृत्त दिलं आहे. सिंध प्रांतात असलेल्या घोटकी जिल्ह्यात दोन एक्स्प्रेस गाड्यांची धडक झाली. सर सय्यद एक्स्प्रेस रेल्वे गाडीने धडक दिल्यानं मिल्लत एक्स्प्रेस रुळावरून घसरली, अशी माहिती घोटकी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी उस्मान अब्दुल्ला यांनी दिली. रेती आणि डहार्की रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. यात जवळपास ३० प्रवासी मरण पावले असून, असंख्य जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू केलं. यावेळी परिसरातील गावकरीही पोलिसांच्या मदतीला धावून आले. मृत आणि जखमी प्रवाशांना रेल्वेतून बाहेर काढण्यात गावकऱ्यांनी मदत केली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, दोन्ही रेल्वे गाड्यांच्या अपघातांचं कारण कळू शकलेलं नाही, अशी माहिती अब्दुल्ला यांनी दिली. एएनआयनेही स्थानिक वृत्त वाहिनीच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.

४ मृतदेह पूर्णपणे छिन्नविच्छिन्न झाले असून, १४ मृतदेह खराब झाले आहेत. असंख्य प्रवाशी रेल्वेच्या बोगीमध्ये अडकलेले आहेत. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बोगी कापाव्या लागणार असून, अवजड मशीन्सची गरज असल्याचंही अब्दल्ला म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: