कला-साहित्यगोवा 

‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’

प्रसिध्द साहित्यिक मुकेश थळी यांचे प्रतिपादन

पणजी :
‘काळीज उसवलां’ या पुस्तकातील लेख उदय म्हांबरो यांनी अत्यंत आत्मियतेने मांडल्याने यामध्ये मानवतेचे स्वर निनादत आहेत, असे प्रतिपादन प्रसिध्द साहित्यिक, कोशकार मुकेश थळी यांनी केले. प्रसिध्द कोंकणी कवी आणि लेखक उदय म्हांबरो यांच्या ‘काळीज उसवलां’ या आत्मवृत्तपर ललितसंग्रहाचे ऑनलाईन प्रकाशनानंतर ते बोलत होते. जीवन विमा अधिकारी आणि गिर्यारोहक दुर्गादास परब यांच्याहस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कोंकणी निबंध, ललित साहित्यामध्ये रविंद्र केळेकर, दत्ता दामोदर नायक, शीला कोळंबकर यांनी संख्यात्मक आणि गुणात्मक भर घातली आहे, तीच परंपरा उदय म्हांबरो यांनी पुढे नेली आहे. अर्धशतका अगोदरचे गोव्यातील सामाजिक, सांस्कृतिक आयुष्य उदय म्हांबरो यांनी आपल्या लालित्यपूर्ण शब्दांत मांडत कोंकणी साहित्याचे दालन समृध्द केले असल्याचे थळी यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. उदय म्हांबरो हे अस्सल कलाकार आणि निवेदक असल्यामुळे त्यांच्या लिखाणातील कथनात्मक शैली रसाळ आणि तितकीच मोहक असल्याचेही थळी यांनी सांगितले. सध्याच्या काळात मानवतेची मूल्यांचा र्‍हास होत असताना, आपल्या आई-वडील, काका-काकी यांनी शिकवलेले व्यवसायातील व्यवहार आणि जगण्याचे व्याकरण उदय म्हांबरो यांनी आपल्या या लिखाणातून निर्मळपणाने मांडत नव्या पिढीला मूल्ये, संस्कार आणि प्रेरणा देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. अनेक प्रसंगांना दिलेली मिस्किल विनोदाची फोडणी तर काही ठिकाणी ह्दयाला पीळ बसेल असा घटनाक्रम यामुळे पुस्तक वाचकाच्या काळजाला सर्वार्थाने हात घालते असेही थळी यांनी यावेळी सांगितले.
अत्यंत प्रामाणिक आणि पारदर्शक स्वभाव असलेल्या उदय म्हांबरो यांच्या स्वभावगुणांचे वैशिष्ट त्यांच्या या ललितसंग्रहात तितक्याच सहजतेने उमटले आहे. या लिखाणामध्ये म्हादईचे संगीत, सूर, नाद आणि लय वाहते आहे, अशा ओघवत्या शब्दांत दुर्गादास परब यांनी ‘काळजी उसावलां’बद्दल सांगितले. आयुष्यातील महत्वाच्या घडामोडी ‘काळीज…’मध्ये अत्यंत तरल शब्दांमध्ये येतात. उदय यांच्यावर जे संस्कार झाले ते गेली 32 वर्षे मी त्यांच्याकडून विविध प्रसंगी ऐकत आहे, ते अनुभव शब्दबद्ध करण्यास आपणच उदय यांना सांगितल्याचे परब यांनी यावेळी नमूद केले.
goa
यावेळी मनोगत व्यक्त करताना उदय नरसिंह म्हांबरो यांनी सांगितले की, आजवरचे कित्येक अनुभव मनामध्ये गच्च साचले होते. या पुस्तकाच्या निमित्ताने जेव्हा ते कागदावर उतरले तेव्हा जीव हलका झाला. वळवई सावय गाव, तिथला निसर्ग, पणजी-मुंबईतले वास्तव्य, मित्रपरिवारामुळे जगण्याला आलेला गोडपणा यामुळे आयुष्य समृध्द झाले. थोरामोठ्यामनी माणूसपण, संस्कार, मूल्यांची जपणूक करण्याची सवय लावली, आणि जगण्याला दिशा मिळाली. थोरामोठ्यांचे हे खूप महत्वाचे ॠण माझ्यावर आहेत, आणि ते आयुष्यभर माझ्यावर राहण्यातच माझा आनंद असल्याचे म्हांबरो यांनी यावेळी नोंदवले. राधिका कामत सातोस्कर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
‘काळीज उसवलां’ हे संजना पब्लिकेशन्सच्यावतीने प्रकाशित पुस्तक ‘अभिनव क्रिएशन’च्यावतीने विक्रीसाठी उपलब्ध असून अमेझॉन इंडियावरून हे पुस्तक घरबसल्या विकत घेऊ शकता, असे यावेळी सांगण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: