मुंबई 

खिशाला खार लावून फैय्याज शेख भरताहेत गरिबांचे पोट

मुंबई :
कोरोनामुळे सध्या काम नसल्यामुळे शहरातील मजुरांची ससेहोलपट सुरु आहे. हातावर पोट असलेल्या या मजुरांचे सध्या खाण्याचेदेखील मोठे हाल झाले आहेत. अशावेळी मालाड मालवणी येथील अंबुजवाडीमधील झील इंग्लिश स्कुलचे संस्थाचालक फय्याज शेख हे या मजुरांसाठी पुढे आले असून, ते आपल्या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दररोज 500 नागरिकांना दोन वेळचे पोटभर जेवण पुरवत आहेत. आपल्या खिशाला तोशीस लावून शेख या नागरिकांना दररोज जेवण देत आहे

 

गेल्या शैक्षणिक वर्षाचे शुल्क वसूल करण्यासाठी शाळांनी पालकांकडे तगादा लावला आहे. असे असतानाच मालाड मालवणी येथील शाळेच्या या संस्थाचालकाने आपल्या ३५० विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शुल्क माफ केले आहे. नोकरी, रोजगार नसल्याने हतबल झालेले हात त्यांच्याकडे अन्नधान्याची मागणी करू लागल्याने शेख यांनी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यानंतर त्यांना समाजातील दानशूर व्यक्तीकडून मदत होऊ लागली आहे. गेले वर्षभरापासून ते विभागातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत.

विभागातील बहुतांश नागरिकांचे हातावर पोट असल्याने ते मोलमजुरी करून दोन वेळचे जेवण करत होते. परंतु कोरोनामुळे येथील नागरिकांना एकवेळचे जेवणही मिळत नसल्याने शेख यांनी  शाळेत कम्युनिटी किचन सुरु केले आहे. या किचनच्या माध्यमातून शेख विभागातील सुमारे 500 नागरिकांना दोन वेळचे जेवण पुरवत आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील विविध भागातून त्यांना मदतीबाबत विचारणा होत असल्याने त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही सुरु आहे. चक्रीवादळामुळे विभागातील पाच घरांचे अतोनात नुकसान झाले. त्या घरातील नागरिकांसाठी तात्पुरत्या राहण्यासाठी शेख यांनी शाळेचे वर्ग खुले करून दिले. तसेच त्यांच्या जेवणाचीही व्यवस्थाही केली.

faiyaj shaikh
फैयाज शेख सपत्नीक

कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे गेल्या संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे शालेय शुल्कत्यांनी माफ केले आहे. याच दरम्यान शेख यांना कोरोनामुळे नोकरी गमवावी लागली. परंतु त्यामुळे न डगमगता विभागातील नागरिकांसाठी विविध सेवा देण्याचे त्यांचे काम सुरूच आहे. यंदाही कोरोनामुळे नागरिकांना अडचण आल्यास या वर्षाचेही शुल्क घायचे कि नाही याचा विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: