मुंबई 

‘कोकणातील विकासकामांना भरघोस निधी देऊ’

रायगड :
गेल्या वर्षीचे “निसर्ग” आणि यावर्षीचे “तौक्ते” चक्रीवादळ या दोन्ही चक्रीवादळानी कोकणातील शेतकऱ्याचे, कष्टकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान केले. मात्र हे महाविकास आघाडीचे शासन सदैव कोकणातील जनतेच्या सोबत आहे. कोकणातील विकासकामांना नेहमीच भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्रीवर्धन येथे केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज (दि.४ जून) रोजी सकाळी ठिक साडेनऊ वाजता श्रीवर्धन शहरातील शिवाजी चौकात श्रीवर्धन नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामाचे तसेच श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरण कामाचे भूमीपूजन पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुनील तटकरे तर पालकमंत्री आदिती तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, श्रीवर्धन नगर परिषद नगराध्यक्ष फैसल मियाजान हुर्जुक, उपनगराध्यक्ष यशवंत चौलकर, मुख्याधिकारी किरण मोरे, पाणीपुरवठा जलनि:सारण व अपंग कल्याण समिती सभापती किरण केळकर, महिला व बालकल्याण समिती सभापती दिशा नागवेकर, क्रीडा व युवक कल्याण समिती सभापती रहमत आराई,स्वच्छता वैधक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती गुलाब मांडवकर, नियोजन व पर्यटन समिती सभापती वसंत यादव, नगरसेवक, नगरसेविका सर्वश्री जितेंद्र सातनाक, सीमा गोरनाक, कामिनी रघुवीर, शबिस्ता सरखोत, अनंत गुरव, प्रितम श्रीवर्धनकर, अंतिम पडवळ, प्रतिक्षा माळी, मीना वेश्विकर, स्वीकृत नगरसेवक अब्दुल कादिर काशीम राऊत, सुनिल पवार, गटनेता बबन चाचले, दर्शन विचारे आदि उपस्थित होते.

केंद्राच्या तुलनेत राज्याने चक्रीवादळग्रस्तांना अधिक पटीने मदत केली. सध्या कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव असल्याने सर्वांनी कोविड नियमांचे काटेकोर पालन करणे तितकेच महत्वाचे आहे. परिस्थिती निश्चितच आव्हानात्मक आहे.मात्र संकटांना न भिता त्यावर मात करणे महत्वाचे आहे असे सांगतानाच आपण भूकंप, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, बॉम्बस्फोट, चक्रीवादळे अशी अनेक संकटे पाहिली व यावर मात करुन आपण पुन्हा उभे राहिलो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्व.नानासाहेब धर्माधिकारी, सी.डी.देशमुख, सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कार्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला आजच्याच दिवशी म्हणजेच दि. ४ जून १६७४ रोजी झाली होती. हा दिवस आपल्या सर्वांसाठी महत्वाचा असून छत्रपती शिवाजी महाराजांना व मावळयांना वंदन करून महाराष्ट्राची वाटचालही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालू राहिल असेही स्पष्ट केले.

संपूर्ण कोकण परिसराचा कॅलिफोर्निया करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यादृष्टीने कोकण रेल्वे, मुंबई-गोवा हायवेचे काम, सागरी महामार्ग, आयकॉनिक पूल या काही महत्त्वाच्या बाबी आहेत असे सांगून अजित पवार यांनी शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने हा शासनाने शेतकऱ्यांसाठी केलेला महत्वाचा निर्णय आहे. श्रीवर्धनच्या १६ ते १८ हजार लोकांसाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी या पाणीपुरवठा योजनेसाठी २३. १३ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. रोह्यातील कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्प पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या जिल्ह्याला निसर्गाने खूप काही दिलेले आहे. त्यामुळे रोजगार निर्माण करण्यासाठी पर्यटन हा महत्वाचा पर्याय आहे. येथे येणाऱ्या लोकांना, पर्यटकांना सांभाळले पाहिजे, त्यांना योग्य मार्गदर्शन करायला हवे, त्यांना चित्रीकरण वा अन्य बाबीसाठी आवश्यक परवानगी देणे, अशी सर्वप्रकारे मदत करायला हवी. या भागात पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांना चांगली वागणूक दिली जावी. ही फक्त शासनाची किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून येथील स्थानिकांची देखील मोठी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

काळाची गरज पाहता सर्वांनी वृक्षलागवड करणे, वृक्षसंवर्धन करणे, ही आवश्यक बाब बनली आहे. शासन याबाबतीत असा कायदाच करणार आहे. सध्याचे वातावरण पाहता हवामानाला साजेसे अशी झाडे लावणे गरजेचे झाले आहे असेही अजित पवार यांनी सांगितले. यावेळी अजित पवार यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्ह्यात केलेल्या विकासकामांचे कौतुक करून कामांचा दर्जा चांगला ठेवा, कामाच्या दर्जाबाबत तडजोड नको, विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. फळबागांचे झालेल्या नुकसानीसाठी शासन मदत करेल असे सांगितले.

यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी गेल्यावर्षी श्रीवर्धनला चक्रीवादळाचा खूप मोठा तडाखा बसला होता. यावेळी आदरणीय शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात व मंत्रिमंडळातील अन्य मंत्री महोदयांनीही तात्काळ रायगड जिल्ह्याचा दौरा करुन येथील नुकसानग्रस्तांना शासनाकडून आवश्यक ती मदत तातडीने दिली. यापुढे श्रीवर्धनचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. श्रीवर्धन पर्यटनदृष्टया अधिक संपन्न करण्याचा मानस यावेळी व्यक्त केला. समुद्रकिनाऱ्यावर अनेक विकासात्मक कामे होत असून सागरी महामार्गाचे स्वप्नही लवकरच पूर्ण करण्यात येईल असेही सुनिल तटकरे यांनी यावेळी सांगितले.

मच्छिमारांसाठी अद्ययावत बंदरे उभी करण्यासाठी प्रयत्नशील असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी महाराष्ट्राचा विकास साधला जाईल. जिल्ह्याच्या विकासात स्व.बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या स्वप्नातील कोकण साकारण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत असेही सुनिल तटकरे शेवटी म्हणाले.

यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मूलभूत प्रश्न सोडवित असताना श्रीवर्धन पर्यटनदृष्टया नावाजण्यासाठी प्रयत्नशील आहे. श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर करण्यात येणाऱ्या सुशोभिकरणामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे, त्यातून स्थानिक तरुणांसाठीच रोजगार निर्मिती होणार आहे. शेवटी बीचचे सुशोभिकरण झालेल्या कामांचे भविष्यात अजित दादांच्याच हस्ते उद्घाटन करु, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष फैजल मियाजान हुर्जुक यांनी केले. तर उपस्थितांचे आभार जितेंद्र सातनाक यांनी मानले. या कार्यक्रमाला कोविडविषयक सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच श्रीवर्धन येथील नागरिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: