गोवा 

‘त्या’ मृत्यूंची चौकशी करण्यासाठी सरकार कोणाची वाट बघतेय?

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा राज्य सरकारला थेट प्रश्न

मडगाव :
गोव्यातील भाजप सरकारने ताबडतोब समाजातील तज्ञ व लष्कराचे अधिकारी यांचे कृतीदल स्थापन करुन त्यांच्याकडे कोविड व्यवस्थापन देणे ही काळाची गरज आहे. गोमेकॉत रोज पहाटे २ ते ६ यावेळेत होणारे मृत्यु ही खरोखरच चिंतेची बाब असून गैरव्यवस्थापन कोठे आहे याची चौकशी करण्यासाठी भाजप सरकार अजुन किती जणांच्या मृत्युंची वाट पाहत आहे असा प्रश्न विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी विचारला आहे.

भाजपच्या दोडामार्ग मंडळाने माझ्यावर केलेल्या टिकेने गोमंतकीयांना डावलुन भाजप नेते नारायण राणेंच्या सोयीसाठी महाराष्ट्रात राजकीय लाभ उठविण्यासाठी ऑक्सिजन पाठविला जात होता हे उघड झाले आहे. माझ्यासाठी गोवा व गोमंतकीय यांना सर्वोच्च प्राधान्य देणे महत्वाचे आहे. आज कोविड महामारीत राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी दुसऱ्यांवर राजकारण करीत असल्याचे आरोप करु नयेत असा जोरदार पलटवार विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर केला आहे. कॉंग्रेस पक्ष व मी स्वत: विश्वातील प्रत्येक माणसाकडे माणुसकीने पाहिले पाहिजे या तत्वांचा आदर करतो. परंतु, आपल्या राज्यातील  लोकांच्या जीवाशी खेळुन इतरांना राजकीय लाभ उठविण्यासाठी मदत करण्याचे नाटक करणे हे अत्यंत दुर्देवी आहे.

आज गोव्यातील अनेक वाहिन्यांनी तसेच समाजमाध्यमांवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या गोवा वैद्यकिय महाविद्यालयाच्या इस्पितळातील भेटीचे थेट प्रक्षेपण केले होते. यावेळी गोमेकॉतील अनागोंदी कारभाराचे चित्र सर्व गोमंतकीयांनी पाहिले. मुख्यमंत्र्यांसमोर आरोग्यसेवेच्या भोंगळ कारभाराचा पाढा वाचणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे मी जाहिर अभिनंदन करतो. ऑक्सिजन पुरवठ्याचा उडालेला फज्जा डॉ. प्रमोद सावंतानी अनुभवला हे चांगले झाले. सदर इस्पितळातील स्वच्छतागृहे व शौचालयांच्या दुरावस्थेची झलक मुख्यमंत्र्याना कळाली. आता तरी मुख्यमंत्री विरोधक टिका करीत नव्हते तर सत्य परिस्थिती कथन करीत होते हे मान्य करतील अशी आशा बाळगतो असे दिगंबर कामत म्हणाले.

covid death
दिगंबर कामत

आज राजकीयदृष्ट्या प्रेरित भाजप सरकार राज्यात ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले भाजपचे पदाधिकारी पोलिस बळाचा वापर करुन गरजु रुग्णांना तातडीने ऑक्सिजन पुरविण्यास जाणाऱ्या आमच्या युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांना वाटेत अडवुन सतावणुक करीत आहेत. यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येवु शकतो याचे भान सरकारला नाही. या संकटकाळात मदत करण्यास पुढे येणाऱ्यांची सरकारने सतावणुक न करता त्यांना सहकार्य केले पाहिजे.

राज्यातील दोन्ही जिल्हाधीकाऱ्यांनी त्वरित या एकंदर प्रकाराची दखल घेवुन, ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेवुन त्यांना ओळखपत्र वा परवानगी पत्र द्यावे. त्यामुळे ऑक्सिजन सिलींडर गोळा करणे, भरणे व रुग्णांकडे पोचवणे हे काम अधिक सोपे होईल असे दिगंबर कामत म्हणाले.

आज गोव्यातील युवक कॉंग्रेस, महिला कॉंग्रेस तसेच इतर समाजसेवी संस्था व कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीमुळेच राज्यातील अनेक लोकांचे जीव वाचले आहेत. सरकारवर विसंबुन राहिल्यास आज राज्यात मृतांची संख्या ३० ते ४० पटिनी वाढली असती असा दावा दिगंबर कामत यांनी केला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: