कला-साहित्य

घर के सामने रखना एक पेड…

  • वामन सुभा प्रभू 

करंजाळेला वर्ष दीड वर्षांआधी नव्या जागेत रहायला आल्यापासून माझ्या बेडरूमच्या खिडकीबाहेर असलेल्या एका झाडाच्या प्रेमात मी आकंठ बुडालो आहे. हे झाड नेमके कसले याची मला माहिती नाही. आज जागतिक पर्यावरण दिन. नेमकी ओळख अजून न पटलेल्या या झाडाबद्दल लिहीण्याचे कारणही तेच. हे झाड सतत माझ्याशी संवाद तर साधत नाही ना असेच काहीसे मला कधी कधी वाटते आणि मी अंतर्मुख होऊन जातो. कोरोना काळात येऊन जाऊन बेडवर येऊन लवंडण्याची ( लवणपाची ) सवय अंगवळणी पडत गेली आणि या झाडाकडील माझं नातं अधिकाधिक दृढ होत गेले.

बेडवर कलंडणे झाले की नजर सरळ या झाडावर जाणे, झाडाच्या अंगावर खेळणारे, बागडणारे लहान मोठे पक्षी निरखणे यामुळे मन प्रसन्न व्हायचे. यातूनच आमचे नाते गहिरे होत गेले. ऋतु बदलत जातात त्यानुसार ते झाडांना बदलत जाण्यास भाग पाडतात हे पुस्तकी शिक्षण प्रत्यक्ष अनुभवण्याची वेळ क्वचितच आतापर्यंत आली होती. पर्वरी वा सांत ईनेज येथे रहात होतो तेथे झाडे नव्हती अशातलाही भाग नाही परंतु त्या झाडांकडे सातत्याने पाहण्याची , त्यांच्यात होणारे बदल , स्थित्यंतरे ओळखण्याची ,अनुभवण्याची संधी मात्र कधी मिळाली नव्हती ती नव्या घरात कोविड परिस्थितीमुळे मिळाली आणि एका झाडाशी खराखुरा संवादच साधता आला.

स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना कवी म्हणून घेणे आवडायचे. त्यांच्या कविता वाचणे वा ऐकणे मलाही आवडते. ‘उमर की ऐसि तैसि ‘ या त्यांच्या एका कवितेतील चार ओळींची आठवण मला यानिमित्ताने झाली आणि त्यानी कवितेत सांगितलेल्या झाडाशी मी या झाडाची तुलना करू लागलो. वाजपेयी आपल्या कवितेत म्हणतात,

घर के सामने रखना एक पेड
उसपर बैठे पक्षीयोंकी बाते अवश्य सुनना ll
घर चाहे कैसा भी हो
घर के एक कोने मे खुलकर हँसने की जगह रखना ll

वाजपेयींच्या कवितेतील ते झाड माझ्या घरासमोर नसले तरी त्यांच्या कविकल्पनेतील झाड माझ्या बेडरूमच्या समोर मी आज पाहातोय आणि त्या झाडाशी आणि फांद्यांवर बसलेल्या पक्षांशी संवाद साधतोय. त्यांच्या गोष्टी ऐकतोय. मागील चार महिन्यात हेमंत ,शिशिरपासून वसंत ऋतुपर्य॔त झाडाच्या रूपात होणारा बदलही मी नियमितपण टिपत आलोय. अगदी पानन पान गळाल्यानंतर ऊघडेबोडके झालेले हे झाड सगळयाच संकटाशी सामना करत आज पुन्हा बहरलेले आहे. पक्षांचा चिवचिवाट पुन्हा कानी पडू लागला आहे.

ग्रिष्माचे चटके सोसत वर्षा ऋतुची झाडाला प्रतिक्षा राहील .नव्या नवरीचे रूप घेण्यास हे झाड पुन्हा सज्ज होऊ लागले आहे आहे. गेले अनेक महिने या झाडाची बदलती रूपे मी निसर्गाशी एकरूप होऊन डोळ्यात साठवून ठेवली आहेत. डोलणारे , बोलणारे हे झाड माझ्या दैनंदिन जीवनातील एक घटक होऊन राहिले आहे. हे झाड आम्हाला नेमका कोणता बरे संदेश देत असेल..संकटे येतील जातील , आपल्या मातीशी कायम जोडून राहण्याचाच संदेश तर ही झाडे आम्हाला देत नाहीत ना?
Happy World Environment Day!!!

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: