महाराष्ट्र

‘अशा’ पद्धतीने होणार दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन 

मुंबई :
करोना कहरामुळे राज्य सरकारने यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत फटकारले होते. उच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याबाबतही विचारणा केली होती. अखेर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संभ्रम दूर केला असून, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात आणि अकरावीच्या प्रवेशाबद्दलची प्रक्रिया आज जाहीर केली. दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के गुणांचे वेटेज दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर तर ५० टक्के गुणांचे वेटेज नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे.

“करोनामुळे उद्भवलेल्या असमान्य परिस्थितीत सर्वसमावेशक असे धोरण तयार करताना शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्यासोबत सुमारे २४ विविध बैठकांद्वारे चर्चा करण्यात आली. या सर्वांशी सखोल चर्चा करून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे धोरण आम्ही निश्चित केले आहे. सदर मूल्यमापन धोरणानुसार, विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मुल्यमापन करण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी नमूद केले.

यामध्ये, “ इयत्ता नववी व इयत्ता दहावीसाठी सुधारित मूल्यामापन योजोना शासन निर्णय दि.८ ऑगस्ट २०२० नुसार मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इयत्ता दहावी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांच्या आधारे निश्चित करण्यात येईल.
१. विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण
२.विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीचे गृहपाठ/ तोडीं परीक्षा/ प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण
३.विद्यार्थ्यांचा इयत्ता नववीचा विषय निहाय अंतिम निकाल ५० गुण
या प्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुण (इयत्ता नववी संपादणूक यासाठी ५० टक्के भारांश व इयत्ता दहावी संपादणूनक यासाठी ५० टक्के भारांश )

varsha gaikwad
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

सदर मूल्यमापन धोरण करताना विद्यार्थ्यांची कोविड-१९ पूर्व काळातील संपादणूक पातळीही विचारात घेतली गेली आहे. सध्या इयत्ता दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या इयत्ता नववीचा निकाल कोविडपूर्व वस्तुनिष्ठ मूल्यमापनावर आधारित आहे. सरल प्रणालीवर सदर निकालाची नोंद आहे. ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यांना कोविड १९ ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल, असे सांगण्यात आले .

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची निकाल समिती असेल, या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीयस्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यंकडून करण्यात येईल. शाळास्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाई याची तरतूद करण्यात आली आहे. मंडळामार्फत जून २०२१ अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे.”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: