‘किमान या वर्षापासून अस्मिताय दिवस साजरा करा’
पणजी: राज्यातील भाजप सरकारने अस्मिताय दिवस हा राज्यस्तरीय कार्यक्रम म्हणून साजरा केला जाईल असे आश्वासन देवून सुद्धा, २०२५ त मध्ये हा दिवस साजरा करण्यात आला नाही, किमान या वर्षा पासून हा दिवस साजरा करावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
“१९ जुलै २०२४ रोजी माझ्या खाजगी सदस्य प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभागृहात आश्वासन दिले होते की अस्मिताय दिवस हा राज्यस्तरीय कार्यक्रम म्हणून साजरा केला जाईल. मात्र, या आश्वासनानंतरही आणि या अस्मिताय दिवसाला ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व असतानाही, जानेवारी २०२५ मध्ये कोणताही औपचारिक सोहळा किंवा राज्यव्यापी कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही,” असे आलेमाव यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
आश्वासन देवून एका वर्षा नंतर या संदर्भातील अधिसुचना जारी करण्यात आली आहे. परुंतू या वर्षी तरी अस्मिताय दिवस हा राज्यस्तरीय कार्यक्रम म्हणून साजरा केला जाईल का असा सवाल त्यांनी केला आहे.
आलेमाव यांनी पत्रात म्हटले आहे ‘‘16 जानेवारी 1967 चा ओपिनियन पोल दिवस हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव असा प्रयोग आहे, जिथे एका प्रदेशातील लोकांना त्यांच्या राजकीय भवितव्या संदर्भात निर्णय घेण्याची संधी देण्यात आली होती.’’
‘‘हा लोकशाहीतील एक धाडसपूर्ण प्रयोग होता, जो भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दृष्टीकोन आणि राज्यकारभारामुळे शक्य झाला. त्यांनी गोव्यातील लोकांच्या इच्छेचा, संस्कृतीचा आणि अस्मितेचा आदर केला.’’ असे आलेमाव यांनी पत्रात नमूद केले आहे.
आलेमाव यांनी पुढे सांगितले की, “हा दिवस गोव्यातील अस्मितेबद्दल आहे, गोव्याच्या लोकांच्या सामूहिक निर्णयाचा सन्मान करण्याबद्दल आहे, आणि या राज्याची ओळख सांगणाऱ्या मूल्यांचे रक्षण करण्याबद्दल आहे.”


